दुष्काळ निवारणाची कामे समन्वयाने करावीत -जिल्हाधिकारी वर्षा मीना

 






संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी २ हजार ५०० शेतकऱ्यांना बियाणे पुरविणार

अकोला, दि.१५ : राज्यातील अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून प्रभावीत झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच जलसाठ्यातीलही पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे येत्या काळात पशुधनासाठी चारा टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यावर मात करण्यासाठी कृषी, जलसंधारण व पाटबंधारे तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी दुष्काळ निवारणाची कामे समन्वयाने करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पिण्याचे पाणी, चारा टंचाई, दुष्काळ निवारणासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, जलसंपदा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाने यांच्यासह कृषी, जलसंपदा, वने आदी विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणावयाचा आहे. यासाठी जिल्हास्तरावरून आदेश देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना उपलब्ध पाणी साठ्यांचे अचूक आरक्षण ठरविण्यात यावेत तसेच सर्व महत्वपूर्ण घटकांचा विचार करून आगामी काळात पुरेसे पाणी उपलब्ध राहील यासाठी प्रभावी नियोजन करण्यात यावे.
सद्यस्थितीमध्ये अकोट आणि तेल्हारा तालुक्यात पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. तरीही या पाण्याचा योग्य विनियोग होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावी.

येत्या काळात चाऱ्याची समस्या जाणवू नये, यासाठी आतापासूनच चाऱ्याची तयारी करणे आवश्यक आहे. सिंचन प्रकल्प लगतच्या गाळपेर जमिनींवर चारा लागवडीचे नियोजन करावे. यासाठी पशूसंवर्धन विभागाने चारा लागवडीसाठी सहकार्य करावे. व्हीबी जी-राम-जीमधून कुशल कामात चारा लागवडीची कामे प्रस्तावित करण्यात यावी.

वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या
वन जमिनी असल्याने याठिकाणी चाऱ्याची लागवड करण्याची शक्यता पडताळून पहावी. तसेच उपलब्ध चाऱ्याची कापणी आणि साठवणूक योग्यरित्या करण्यात यावी. जेणेकरून आगामी काळात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देता येईल.

चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारे जिल्ह्यातील 2 हजार 500 शेतकऱ्यांची चारा लागवड योजनेअंतर्गत निवड करण्यात आली आहे. यासाठी एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. यानुसार अधिकाधिक शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तिसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वारसांशी संपर्क साधून प्रयत्न करण्यात यावे. यासाठी पाठपूरावा करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी क्षेत्रिय स्तरावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी दिले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा