संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी १२५ कोटी ८४ लक्ष रू. चा आराखडा जिल्ह्यात ७३९ गावांत २ हजार २१९ उपाययोजना; आराखडा शासनाला सादर
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी
१२५ कोटी ८४ लक्ष रू. चा आराखडा
जिल्ह्यात ७३९ गावांत २ हजार २१९ उपाययोजना; आराखडा शासनाला सादर
अकोला, दि. १२ : जिल्ह्यात ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२५ कोटी ८४ लाख ४ हजार रुपयांचा एकूण खर्च असणारा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला असून, पुढील मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्यासह भूजल सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिक व ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांच्या संयुक्त स्वाक्षरीसह आराखडा पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एकूण ७३९ गावांमध्ये २ हजार २१९ विविध उपाययोजना राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या आराखड्यानुसार तालुकानिहाय गावे आणि त्यासाठी प्रस्तावित निधी पाहता, अकोला तालुक्यातील १३७ गावांमध्ये ४९९ उपाययोजना प्रस्तावित असून, अंदाजे खर्च ६८ कोटी २६ लाख ४५ हजार रु. आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील १२५ गावांच्या ४३४ उपाययोजनांसाठी १३ कोटी ७५ लाख ८६ हजार रु. खर्च अपेक्षित आहे. बाळापूर तालुक्यातील ८७ गावांमध्ये २९६ उपाययोजना अपेक्षित आहेत. त्यासाठी १० कोटी ११ लाख ९८ हजार रु. खर्च नियोजित आहे,
पातूर तालुक्यातील ८९ गावांच्या टंचाई निवारणासाठी २७९ उपाययोजना राबविण्यात येतील आणि १६ कोटी २६ लाख ९ हजार रु. खर्च होईल. मूर्तिजापूर तालुक्यातील १४४ टंचाईग्रस्त गावांमध्ये १० कोटी ६६ लाख २८ हजार रु. निधीतून ४४२ उपाययोजना राबविण्यात येतील.
अकोट तालुक्यातील ८३ गावांमध्ये १३९ उपाययोजना राबविण्यात येऊन त्यासाठी अंदाजे खर्च ५ कोटी ५ लाख ७४ हजार रु. आहे. त्याचप्रमाणे, तेल्हारा तालुक्यातील ७४ गावांच्या १३० उपाययोजनांसाठी १ कोटी ७१ लाख ६४ हजार रुपयांच्या खर्च अपेक्षित आहे.
विविध उपाययोजनांचा समावेश
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्याभरात विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यामध्ये जमिनीतील पाणी पातळी टिकवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ७२ सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण आणि त्यातील गाळ काढण्याचे काम केले जाईल. तीव्र टंचाईच्या काळात तात्काळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ५७९ खाजगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. गावांना थेट पाणीपुरवठा करण्यासाठी ४८७ टँकर, बैलगाडी याद्वारे पुरवठा होईल. ग्रामीण भागातील १०९ नळ पाणीपुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती केली जाईल.
विशेष गरजेच्या ठिकाणी ३० तात्पुरत्या पूरक नळ योजना कार्यान्वित केल्या जातील. पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी ४७१ हातपंप, विंधन विहिरींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यात नव्या पाणी स्रोतांची निर्मिती करण्यासाठी ३१८ नवीन विंधन विहिरी आणि १५३ नवीन कूपनलिका अशी एकूण ४७१ नवीन कामे पूर्ण करण्यात येतील.
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सविस्तर आराखडा शासनाला सादर करण्यात आला असून, दुष्काळविषयक सर्व कामांना प्राधान्य देऊन प्रशासनाकडून युद्धपातळीवर अंमलबजावणी केली जात आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा