अंतर्गत तक्रार समिती सदस्य कार्यशाळेत २५० व्यक्तींचा सहभाग

 

 

अंतर्गत तक्रार समिती सदस्य कार्यशाळेत २५० व्यक्तींचा सहभाग

अकोला, दि. १६ : सेवा संकल्प अभियानात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत तक्रार समितीच्या  सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यात सुमारे अडीचशे सदस्यांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आशा मिरगे, डॉ. सीमा तायडे, ॲड. सुनीता कपिले, ॲड. राधा मिश्रा आणि ॲड. सोनाली गुल्हाने उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. संजय सेंगर आणि श्रीमती शुभांगी लहूडकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शकांनी पॉश कायदा, २०१३ मधील महत्त्वपूर्ण कायदेशीर तरतुदी, कायद्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी, कायद्यातील विविध कलमे, अंतर्गत तक्रार समितीची रचना व कार्ये, समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या जबाबदाऱ्या तसेच तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

 

कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती लक्ष्मी पारस्कार यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेस २५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्यांना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम करणे आणि महिलांना न्याय्य व सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

 

 ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा