शुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान ! विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत असे करा मतदान...

                                                 शुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान !

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या

निवडणूकीत असे करा मतदान...

 

अमरावती दि. १४ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी येत्या शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान पद्धती आणि आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या अन्य सार्वत्रिक निवडणुकातील मतदानाची पद्धती यात मूलभूत फरक आहे. विधानपरिषद निवडणूकीचे मतदान हे मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवून घेण्यात येते. जितके उमेदवार निवडणूक लढवित असतील अशा सर्वांपुढे पसंतीक्रम नोंदविता येतो. मतदानाच्या या वेगळ्या पद्धतीमुळे मतदारांनी आणि विशेषत: प्रथमच मतदान करणाऱ्यांनी ही पद्धत जाणून योग्यरितीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. 



असे करा मतदान :

मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेबरोबर पुरवलेले जांभळ्या (व्हायलेट) रंगाचे स्केच पेनच वापरावे. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नये. असे केल्यास तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.

उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर १  असा आकडा लिहून मतदान करा. १  हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्यावा.

निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील.

उर्वरीत उमेदवारांबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम, अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रम या स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार २, ३, ४ इत्यादी आकडे टाकून दर्शवा.

कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर आपण फक्त एकच आकडा टाकलेला आहे याची खात्री करून घ्यावी. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर टाकलेला नाही याची देखील खात्री करुन घ्यावी. पसंतीक्रम फक्त १, २, ३ इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवावा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नये. पसंतीक्रमाचे आकडे भारतीय अंकाच्या 1, 2, 3 इत्यादींसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रुपात किंवा १, २, ३ अशा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील.

मतपत्रिकेवर मतदाराने आपले नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत किंवा स्वाक्षरी करु नये. तसेच आपल्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नये. असे केल्यास आपली मतपत्रिका अवैध ठरेल. 

पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर √ किंवा X अशी खूण करणे टाळावे. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. पसंतीक्रम फक्त आकड्यांमध्येच दर्शवावा. 

आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहेत. म्हणजेच इच्छेनुसार दुसरी किंवा पुढील पसंती दर्शवावी.




अशा मतपत्रिका अवैध ठरतील:

१  हा आकडा टाकलेला नसल्यास. १  हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर टाकलेला असल्यास. १  हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी टाकलेला आहे याबाबत शंका निर्माण होईल अशाप्रकारे टाकलेला असेल. एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ आणि त्याबरोबर २, ३ इत्यादी आकडे देखील टाकलेले असतील. पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शवलेला असेल. मतदाराची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असले, आणि असे आकडे टाकण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा टाकलेला असेल, तरी अशी मतपत्रिका अवैध ठरेल.

 

--००--





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा