अकोलाकरांसाठी दिवाळी भेट : रेल डाक सेवा काउंटरवर आता रात्रीही होणार पार्सल बुकिंग ! परदेशात आणि देशांतर्गत दिवाळी फराळ व भेटवस्तू पाठवण्यासाठी रात्री 9 वाजेपर्यंत विशेष सुविधा भारतीय टपाल विभागाचा अभिनव उपक्रम
अकोलाकरांसाठी दिवाळी भेट : रेल डाक सेवा काउंटरवर आता रात्रीही होणार पार्सल बुकिंग !
परदेशात आणि देशांतर्गत दिवाळी फराळ व भेटवस्तू पाठवण्यासाठी रात्री 9 वाजेपर्यंत विशेष सुविधा
भारतीय टपाल विभागाचा अभिनव उपक्रम
अकोला, दि. 26 : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रियजनांना भेटवस्तू, मिठाई आणि पारंपरिक दिवाळी फराळ पाठवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी भारतीय टपाल विभागाने एक मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सणाच्या काळात सुलभ सेवा देण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील 'अकोला रेल डाक सेवा' (आरएमएस) काउंटरवर विशेष रात्रीकालीन पार्सल बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. दिवाळीच्या या आनंददायी काळात अकोला आणि परिसरातील सर्व नागरिकांनी टपाल विभागाच्या या विस्तारित बुकिंग सुविधेचा आणि विश्वासार्ह सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रेल डाक सेवा (नागपूर) चे अधीक्षक गणेश बा. आंभोरे तसेच अकोला रेल डाक सेवा यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
संध्याकाळच्या वेळेत काउंटर सुरू ; व्यापारी व नागरिकांना मोठा फायदा
टपाल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे विशेष काउंटर दुपारी 4.00 ते रात्री 9.00 (21.00 वाजेपर्यंत) सुरू राहील. सणासुदीच्या काळात नेहमीच्या कार्यालयीन वेळेत कामावर किंवा इतर व्यापांमुळे जाणे शक्य नसणाऱ्या नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिक संस्थांना या विस्तारित वेळेचा मोठा फायदा होणार आहे. नागरिक आपल्या सोयीनुसार संध्याकाळच्या वेळेत जाऊन पार्सल बुक करू शकतात.
स्पीड पोस्ट बुकिंग (Speed Post), पार्सल बुकिंग (Domestic Parcel), आंतरराष्ट्रीय टपाल बुकिंग (International Mail Services - पत्रे, पार्सल आणि EMS) या प्रमुख सेवा अकोला रेल डाक सेवा काउंटरवर पुरविण्यात येणार आहे, याचाही जिल्ह्यातील व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा.
'सीमापार पोहोचवा दिवाळीचा गोडवा': आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा
देशांतर्गत सेवांसोबतच, परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना आणि मित्रांना दिवाळीचा गोडवा पाठवण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा' अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेद्वारे नागरिक दिवाळीचा फराळ, सुका मेवा व इतर योग्य खाद्यपदार्थ परदेशात सहज पाठवू शकतात. तसेच खाद्यपदार्थ पाठवताना संबंधित देशाचे आयात नियम (Import Rules), सीमाशुल्क (Customs Regulations) आणि अन्न सुरक्षाविषयक अटींचे पालन करणे अनिवार्य आहे.
खाद्यपदार्थ परदेशात पाठवण्यापूर्वी ते व्यवस्थित आणि सुरक्षितरीत्या सील केलेले असावेत, प्रत्येक देशाचे आयात नियम वेगळे असतात. त्यामुळे पार्सल पाठवण्यापूर्वी संबंधित देशात ते पदार्थ पाठवण्यास परवानगी आहे किंवा नाही, याची खात्री नागरिकांनी काउंटरवर करून घ्यावी, असे आवाहन रेल डाक सेवा (नागपूर) चे अधीक्षक गणेश बा. आंभोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा