अकोला जिल्हा प्रशासनाचे आवाहन ; रब्बी हंगामात जास्त पाणी लागणारी पिके घेणे टाळा
अकोला जिल्हा प्रशासनाचे आवाहन ; रब्बी हंगामात जास्त पाणी लागणारी पिके घेणे टाळा
अकोला, दि. 12 : यावर्षी जिल्ह्यात झालेल्या कमी पावसामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. आगामी काळात तीव्र पाणीटंचाई भासू नये आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित राहावेत, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तसेच अकोल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी शेतकरी बांधवांसाठी रब्बी हंगामात जास्त पाणी लागणारी पिके न घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाची प्राथमिकता पिण्याचे पाणी :
मानवी जीवन आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध खाजगी विहिरी देखील अधिग्रहित केल्या जाण्याची शक्यता बळावली आहे. अशा स्थितीत पाण्याचा उपसा केल्यास पिकांना पुरेसे पाणी मिळणार नाही आणि पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
शेतकऱ्यांना प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन :
पिकांचे नियोजन : शेतकऱ्यांनी चालू रब्बी हंगामामध्ये जास्त पाणी लागणारी पिके घेणे पूर्णपणे टाळावे.
बियाणे खरेदी: जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या बियाण्यांची खरेदी व वापर करण्यापासून शेतकऱ्यांनी स्वतःहून परावृत्त व्हावे.
पाण्याचा काटेकोर वापर: उपलब्ध पाण्याचा अत्यंत नियोजनबद्ध आणि काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
गावोगावी निर्माण होणारी संभाव्य पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि स्वतःच्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती कृषि विभागाकडून करण्यात आली आहे.
00000

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा