मूर्तीजापूरमध्ये महाराजस्व समाधान शिबिरातून दाखले व लाभ वितरण शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ; दाखले, आरोग्य सुविधा, कृषी व वीज जोडणीसह विविध सेवांचा समावेश
मूर्तीजापूर, दि. १९ : सेवा संकल्प अभियानांतर्गत मूर्तीजापूर तहसील कार्यालयात महाराजस्व समाधान शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, सनदा, आरोग्य सुविधा आणि शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. या शिबिरातून दोन हजारहून अधिक लाभ व सेवा वितरणाच्या नोंदी झाल्या.
शिबिरात महसूल, आरोग्य, पुरवठा, भूमी अभिलेख, कृषी, महिला व बालविकासाशी संबंधित उपक्रम, नगर परिषद, वीज वितरण आणि परिवहन विभागाच्या सेवांचा समावेश होता. नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये आणि शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात तालुका कृषी विभागामार्फत १ हजार २०० महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आरोग्य विभागाकडून ३५० गोल्डन कार्ड वितरित करण्यात आली, तर ३० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नगर परिषदेमार्फत जन्म-मृत्यूची १३५ प्रमाणपत्रे देण्यात आली. गावठाणातील नागरिकांना ६२ स्वामित्व सनदांचे वितरण करण्यात आले, तर भूमी अभिलेख विभागामार्फतही ६२ स्वामित्व सनदांचे वितरण करण्यात आले.
महसूल विभागांतर्गत ७८ उत्पन्न प्रमाणपत्रे, ५४ वय व अधिवास प्रमाणपत्रे, १९ जात प्रमाणपत्रे, १७ ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे आणि ४७ नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच ५६ जिवंत सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.
पुरवठा विभागामार्फत ५८ शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या. महिला बचत गटांच्या ३० नोंदणी करण्यात आल्या. वीज वितरणाशी संबंधित १५ प्रलंबित घरगुती वीज जोडण्यांना मंजुरी देण्यात आली, तर मालमत्ता हस्तांतरणानंतर वीज जोडणीच्या नोंदीत नवीन मालमत्ताधारकांची नावे समाविष्ट करण्याची १० प्रकरणे निकाली काढण्यात आली. याशिवाय पाच नवीन नळ जोडण्या देण्यात आल्या आणि ५२ शिकाऊ वाहनचालक अनुज्ञप्तींचे वितरण करण्यात आले.
या समाधान शिबिरास उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, अपर तहसीलदार गिरिजादेवी लोखंडे, नायब तहसीलदार रविंद्र राऊत, महेश नागोलकर, दिनेश सोनोने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय योजनांचे लाभ आणि विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा