दुष्काळ सदृश परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी अकोला जिल्ह्यात विशेष दुष्काळ व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशाने विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित; तालुकास्तरावर तहसीलदार समन्वयक-सह-नोडल अधिकारी

 दुष्काळ सदृश परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी अकोला जिल्ह्यात विशेष दुष्काळ व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना


जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशाने विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित; तालुकास्तरावर तहसीलदार समन्वयक-सह-नोडल अधिकारी

अकोला, दि. ५  : अकोला  जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने संभाव्य परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन, विविध विभागांमध्ये समन्वय, उपाययोजनांचे नियमित संनियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशाने जिल्हा वॉर रूम कक्षांतर्गत “विशेष दुष्काळ व्यवस्थापन प्राधिकरण” स्थापन करण्यात आले आहे.

या प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातील दुष्काळ व्यवस्थापनाशी संबंधित विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे. विभागनिहाय उपाययोजना, पूर्ण व लंबित कामे, गंभीर बाबी, नागरिकांच्या तक्रारी तसेच पुढील नियोजनाची माहिती संकलित करून त्याचे सातत्याने संनियंत्रण करण्यात येणार आहे.

विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित

दुष्काळ व्यवस्थापनासाठी महसूल, कृषी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, बँकिंग, जिल्हा नियोजन, नगरपरिषद प्रशासन, मृद व जलसंधारण, पाटबंधारे, भूजल सर्वेक्षण, पुरवठा, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, पणन आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना विभागनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

यामध्ये विशेषतः पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलस्रोतांची स्थिती, सिंचनासाठी पाणी, पीक परिस्थिती व दुष्काळी पंचनामे, बियाणे व कृषी निविष्ठा, पशुधनासाठी चारा व पाणी, वीजपुरवठा, अन्नधान्याचा पुरवठा, शेतकरी व नागरिकांच्या तक्रारी, रोजगार आणि आवश्यक निधी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर तहसीलदार समन्वयक-सह-नोडल अधिकारी

दुष्काळ व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांची “तालुकास्तरीय समन्वयक-सह-नोडल अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व संबंधित शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि क्षेत्रीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदारांची राहणार आहे.

तालुकास्तरावर यापूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या दुष्काळ नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, अडचणी व मागण्यांची नोंद घेण्यात येणार आहे. संबंधित तक्रारी तात्काळ संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचे अनुपालन प्राप्त करून त्याची माहिती जिल्हा वॉर रूमकडे पाठविण्यात येणार आहे.

संबंधित विभागाकडून विहित कालावधीत कार्यवाही न झाल्यास किंवा कार्यवाहीमध्ये कसूर झाल्यास याबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती जिल्हा वॉर रूमकडे तात्काळ कळविण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी/यंत्रणेची जबाबदारी निश्चित करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच लागू असलेल्या इतर संबंधित अधिनियम, नियम, शासन निर्णय व निर्देशांनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

गंभीर परिस्थितीवर तात्काळ प्रतिसाद

पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई, टँकरची आवश्यकता, जलस्रोतांच्या उपलब्धतेतील गंभीर समस्या, पशुधनासाठी चारा अथवा पाण्याची टंचाई किंवा दुष्काळाच्या अनुषंगाने इतर कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास साप्ताहिक आढाव्याची प्रतीक्षा न करता संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा नोडल अधिकारी किंवा जिल्हा वॉर रूम कक्षाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक राहणार आहे.

दर मंगळवारी जिल्हास्तरीय आढावा

दुष्काळ व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा दर मंगळवारी नियमित जिल्हास्तरीय आढावा घेण्यात येणार आहे.

संबंधित जिल्हास्तरीय विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अद्ययावत माहिती, अनुपालन, प्रलंबित बाबी, गंभीर बाबी आणि पुढील नियोजनासह बैठकीस उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

नागरिकांसाठी दुष्काळ व्यवस्थापन हेल्पलाईन

दुष्काळ व्यवस्थापनाशी संबंधित पिण्याचे पाणी, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा व पाणी, पीक परिस्थिती, वीजपुरवठा, जलस्रोत तसेच इतर दुष्काळविषयक अडचणी किंवा तक्रारी नागरिकांनी जिल्हा वॉर रूमच्या हेल्पलाईनवर कळवाव्यात.

☎️ दुष्काळ व्यवस्थापन हेल्पलाईन : ०८०६५९०९८४४

नागरिकांकडून प्राप्त तक्रारींची नोंद घेऊन त्या संबंधित विभागाकडे तात्काळ कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील व यावरील कार्यवाहीचा पाठपुरावा करण्यात येईल.

जिल्हा शासनाचा उद्देश दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर केवळ प्रतिसाद देण्याऐवजी संभाव्य परिस्थितीचा पूर्वअंदाज घेऊन विभागनिहाय पूर्वतयारी, तात्काळ प्रतिसाद, प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण संनियंत्रणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक सेवा व मदत वेळेत उपलब्ध करून देणे हा आहे.

जिल्हा वॉर रूम कक्ष, अकोला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा