केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी उपलब्धी पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर








 

केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी

अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी उपलब्धी

पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला, दि. १५ : केंद्रीय विद्यालयासारखी महत्वपूर्ण शैक्षणिक संस्था अकोल्यात सुरू झाली आहे. अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी उपलब्धी आहे.  त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी व उज्ज्वल भविष्याची हमी मिळाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय दिवशी केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, केंद्रीय विद्यालय समितीचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर यंत्रणांचे अधिकारी  आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आयआयटी, केंद्रीय विद्यालयासारख्या महत्वपूर्ण शैक्षणिक संस्थांचा विस्तार होत आहे. अकोल्यात केंद्रीय विद्यालय असावे, असे माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे.  

खासदार श्री. धोत्रे म्हणाले की, अकोल्यात केंद्रीय विद्यालय सुरू होणे अत्यंत आनंदाची बाब आहे. यापुढे ४५ कोटी रु. निधीतून केंद्रीय विद्यालयाची नवीन इमारत, सुविधापूर्ण परिसर निर्माण होणार आहे. केंद्रीय विद्यालयासाठी जागा निश्चिती, लवकरात लवकर सत्र सुरू करता येणे यासाठी सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले व आज प्रवेशोत्सव होत आहे. नोकरीनिमित्त बदल्या होणाऱ्या पालकांच्या पाल्यांना निरंतर शिक्षणासाठी ही चांगली सुविधा आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सांगितले.

 

शाळेच्या प्रवेशोत्सवप्रसंगी प्रवेशित चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पालकांच्या चेह-यावरही आनंद झळकत होता. यावेळी विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते खाऊवाटप झाले.विद्यार्थ्यांनी भारत स्वर्णीम गौरव गीत सादर केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. केंद्रीय विद्यालय मुंबई कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन