शिष्यवृत्ती अर्जापूर्वी विद्यार्थ्यांनी घ्यावी काळजी अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास पुढील शिष्यवृत्तीवर परिणाम; समाजकल्याण विभागाचे आवाहन
शिष्यवृत्ती अर्जापूर्वी विद्यार्थ्यांनी घ्यावी काळजी
अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास पुढील शिष्यवृत्तीवर परिणाम; समाजकल्याण विभागाचे आवाहन
अकोला, दि. ६ : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य असल्याने, कोणताही अभ्यासक्रम अर्धवट सोडू नये, असे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही विभागाने दिला आहे.
बारावीनंतर अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी किंवा कृषी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, प्रवेश निश्चित होईपर्यंत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून काही विद्यार्थी बी.ए., बी.एस्सी. किंवा बी.कॉम. यांसारख्या बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना तात्पुरता प्रवेश घेतात. या कालावधीत ते महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचा अर्ज करून त्याचा लाभही घेतात.
पुढील शैक्षणिक वर्षात अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यानंतर पूर्वीचा अभ्यासक्रम अर्धवट सोडावा लागतो. मात्र, शिष्यवृत्तीच्या नियमानुसार एकदा लाभ घेतलेला अभ्यासक्रम पूर्ण न करता सोडल्यास नवीन अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज अपात्र ठरू शकतो. तसेच, विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली शिष्यवृत्तीची रक्कम शासनाकडे परत करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
ही बाब लक्षात घेऊन चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाच्या वेळीच योग्य समुपदेशन करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. केवळ पर्यायी व्यवस्था म्हणून बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या आणि भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यापूर्वी महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाशी सविस्तर चर्चा करावी. अनावधानाने घेतलेला शिष्यवृत्तीचा लाभ भविष्यातील शैक्षणिक संधीवर परिणाम करू शकतो, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयाने केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा