नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (टप्पा-२) ; शेतकरी, बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध घटकांतर्गत अनुदानाची मोठी संधी ; · प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (टप्पा-२)

शेतकरी, बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी

विविध घटकांतर्गत अनुदानाची मोठी संधी

·         प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

अकोला, दि. १७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत जिल्ह्यातील कृषी व ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी शेतकरी, महिला स्वयंसहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुषार जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गट, गाव संघ, प्रभाग संघ, लोकसंचालित साधन केंद्र आणि पेसा क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायती आदी पात्र असून कृषी व्यवसाय विकासासाठी संस्थांना ६० लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. गोदाम उभारणी, बीज प्रक्रिया केंद्र, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, मूल्यवर्धन, पॅकिंग व साठवणूक केंद्र आदी उपक्रमांचा यात समावेश आहे.

या योजनेंतर्गत कमाल १.०० कोटी मूल्याचे प्रकल्प विचारात घेतले जाणार असून, पात्र संस्थांना प्रकल्प मूल्याच्या ६०% किंवा कमाल ६०.०० लाखांपर्यंत 'क्रेडिट लिंक्ड बॅक-एंडेड' अनुदान मिळेल. २०.०० लाखांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या प्रस्तावांसाठी नोंदणीकृत बँक/वित्तीय संस्थेकडून नियमानुसार कर्ज घेणे अनिवार्य राहील.

वैयक्तिक लाभाच्या विविध योजना

शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर सक्षम करण्यासाठी प्रकल्पांतर्गत पुढीलप्रमाणे घटकांसाठी सहाय्य दिले जाते. सिंचन व जलसंधारण या घटकांतर्गत ठिबक व तुषार सिंचन, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, विहीर पुनर्भरण आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन यासाठी अनुदान दिले जाते. शेती व फलोत्पादन या घटकांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, वानिकी आधारित वृक्ष लागवड, बिजोत्पादन आणि रेशीम उद्योग साठी अनुदान दिले जाते. संरक्षित शेती व खत निर्मिती या घटकांतर्गत गांडूळ खत व नाडेप युनिट, शेडनेटगृह/हरितगृह लागवड साहित्य आणि पॅक हाऊस करीता अनुदान तसेच अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांसाठी पाईप आणि पंप संचासाठी विशेष अर्थसहाय्य केले जाते.

या सर्व घटकांसाठीचे अनुदान Direct Benefit Transfer (DBT) डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असून, ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, जलद व सुलभरित्या  केल्या जाते.

सध्या अकोला जिल्ह्यातील प्रकल्प गावांमध्ये प्रामुख्याने ठिबक व तुषार सिंचनासाठीच अर्ज प्राप्त झाले असून, इतर घटकांसाठी अर्जांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील पात्र शेतकरी, शेतकरी गट आणि महिला बचत गटांनी अधिकृत डीबीटी पोर्टलवर तातडीने ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन