आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी आदिवासी विकास विभाग: अॅनिमिया निवारण कार्यक्रमासाठी ‘सीएसीआर’सोबत करार

 

 

 

  आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी

आदिवासी विकास विभाग: अॅनिमिया निवारण कार्यक्रमासाठी ‘सीएसीआर’सोबत करार

          अकोला, दि. २५ : राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागामार्फत सध्या राज्यभरात 'अॅनिमिया निवारण कार्यक्रम' युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत राज्यात अवघ्या दीड महिन्यात २०४ शाळांमधील ७९,६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

 

          अॅनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने 'सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स' (सीएसीआर) या संस्थेशी सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची एचबी पातळी तपासली जात आहे.

 

आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. 'अॅनिमिया निवारण कार्यक्रमा'च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयासारख्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन युद्धपातळीवर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे, असे आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले.  

 

या मोहिमेत अमरावती आणि नागपूर विभागात अनुक्रमे २,८९८ आणि १,८३१ विद्यार्थ्यांच्या एचबी पातळी मोजण्यात आली आहे. अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १,८८५ विद्यार्थी आणि ३ अनुदानित आश्रमशाळेच्या १,०१३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ विद्यार्थी आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १,२९५ विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिन तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

          दरम्यान, या तपासणी मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांमध्ये एचबीचे प्रमाण कमी आढळले, त्यांना पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राखण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विभागाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन