*अकोला जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ; 'एसआयआर'मध्ये जिल्ह्यात १३ लाख १८ हजार ६५२ मतदार ; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत ; प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नसलेली नावे akola.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध*

*अकोला जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध* *'एसआयआर'मध्ये जिल्ह्यात १३ लाख १८ हजार ६५२ मतदार* *दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत* *प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नसलेली नावे akola.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध* अकोला, दि. ३१ ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. अकोट, बाळापूर, अकोला (‍पश्चिम), अकोला (पूर्व), मुर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांतील एकूण १३ लाख १८ हजार ६५२ मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश आहे. प्रारूप मतदार यादीतील नोंदींबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व पात्र मतदारांनी उपरोक्त कालावधीत दावे व आक्षेप संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक नोंदणी अधिकारी यांच्याकडे नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. *मतदारसंघनिहाय मतदार संख्या* प्रारूप मतदार यादीनुसार अकोट विधानसभा मतदारसंघात १ लाख ३९ हजार ७५७ पुरुष, १ लाख २५ हजार ७०२ महिला आणि ४ इतर असे एकूण २ लाख ६५ हजार ४६३ मतदार आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ४१ हजार ४३९ पुरुष, १ लाख ३० हजार ३५९ महिला आणि ०१ तृतीयपंथी, असे एकूण २ लाख ७१ हजार ७९९ मतदार आहेत. अकोला (‍पश्चिम) विधानसभा मतदारसंघात १ लाख २१ हजार ४१० पुरुष, १ लाख १७ हजार १९९ महिला आणि १३ तृतीयपंथी, असे एकूण २ लाख ३८ हजार ६२२ मतदार आहेत. अकोला (पूर्व) विधानसभा मतदारसंघात १ लाख ४२ हजार १८५ पुरुष, १ लाख ३२ हजार ७०८ महिला, आणि १२ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ७४ हजार ९०५ मतदार आहेत. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ३८ हजार ६१४ पुरुष, १ लाख २९ हजार २४७ महिला आणि २ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ६७ हजार ८६३ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण ६ लाख ८३ हजार ४०५ पुरुष, ६ लाख ३५ हजार २१५ महिला आणि ३२ तृतीयपंथी, असे एकूण १३ लाख १८ हजार ६५२ मतदार प्रारूप मतदार यादीत समाविष्ठ आहेत. गणनापत्रक बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा न केलेल्या २ लाख ७६ हजार ९९२ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. या मतदारांमध्ये अनुपलब्ध/ गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंदणी केलेले किंवा दुबार तसेच इतर कारणांतील मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ५१ हजार २६ अनुपलब्ध/गैरहजर, १ लाख ३४ हजार ५८९ कायमस्वरूपी स्थलांतरित, ४६ हजार २७४ मृत, ४४ हजार ४४८ अन्यत्र नोंदणी केलेले/दुबार आणि ६८२ इतर, असे २ लाख ७६ हजार ९९२ मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता अकोटमध्ये एकूण ४१ हजार ४४९, बाळापूरमध्ये ३६ हजार ५५, अकोला (‍पश्चिम)मध्ये ९४ हजार ९३९, अकोला (पूर्व) ७५ हजार २८८, मुर्तिजापूरमध्ये २९ हजार २६१ असे एकूण २ लाख ७६ हजार ९९२ मतदार एएसडीडी (अनुपलब्ध/ कायमस्वरूपी स्थलांतरित/ मृत/ दुबार नोंदणी) यादीत समाविष्ठ आहेत. *दावे व हरकती दाखल करण्याची संधी* प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेले मतदार तसेच १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार नाव नोंदणीसाठी नमुना ६ भरू शकतात. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती किंवा स्थलांतरासाठी नमुना ८, तर एखाद्या नोंदीच्या वगळणीसाठी नमुना ७ भरता येईल. संबंधित घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रांसह हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. नमुना ६, ७ आणि ८ हे अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा किंवा विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीला एक वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. दावे व हरकती एकगठ्ठा पद्धतीने दाखल करता येणार नाहीत. केवळ वैयक्तिक दावे व हरकती स्वीकारले जातील. मात्र, एकाच घरातील किंवा कुटुंबातील सदस्यांशी संबंधित वैयक्तिक दावे व हरकती एकत्रितपणे सादर करता येतील. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना एका दिवसात १० दावे किंवा हरकती दाखल करता येतील. एसआयआर च्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीने ३० पेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी त्याची स्वतः पडताळणी करतील. दावे व हरकतींच्या कालावधीत प्राप्त नमुना ६, ७ आणि ८ मधील अर्जांचा तपशील अनुक्रमे नमुना ९, १० आणि ११ मध्ये तयार करून कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच हा तपशील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दर आठवड्याला उपलब्ध करून देण्यात येईल. *एएसडीडी मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर* प्रारूप मतदार यादीत समाविष्ट न झालेल्या अनुपलब्ध गैरहजर, स्थलांतरित, मृत, दुबार व इतर मतदारांच्या याद्या पंचायत समिती व नगरपरिषद कार्यालयांच्या सूचना फलकावर तसेच जिल्ह्याच्या (akola.gov.in) संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येतील. प्रारूप मतदार यादीची छायाचित्र नसलेली सॉफ्ट कॉपी वाशिम जिल्ह्याच्या www.akola.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिक तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यादी पाहून दावे व हरकती नोंदवू शकतात. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मतदार यादीची प्रत्येकी एक छायाचित्र नसलेली सॉफ्ट कॉपी तसेच एक मुद्रित प्रत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २४ अंतर्गत अपिलाची तरतूद आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध कलम २४(अ) नुसार जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे अपिल करता येईल. पहिल्या अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध कलम २४(ब) नुसार, मतदार नोंदणी नियम, १९६० मधील नियम २७ अन्वये विहित पद्धतीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दुसरे अपिल करता येईल. *४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी* विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली. प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी आहे. नोटीस टप्पा तसेच दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित नमुन्यात दावे किंवा हरकती निर्धारित कालावधीत दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. 00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन