अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३०० कोटींचा निधी प्राप्त ; प्रलंबित व्याज परतावा वितरणाला गती

 

                  अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३०० कोटींचा निधी प्राप्त ;

                          प्रलंबित व्याज परतावा वितरणाला गती

 

          अकोला, दि. १७ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला ३०० कोटींचा निधी नुकताच महामंडळाच्या खात्यात जमा झाला असून, प्रलंबित व्याज परतावा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

       व्याज परतावा योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून एकूण ७५० कोटी मंजूर करण्यात आला होते.  पहिला हप्ता २० मे २०२६ रोजी १५० कोटी प्राप्त झाला होता आणि योजनेतील लाभार्थ्यांना तो वितरित करण्यात आला. त्यानंतर  ३ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयानुसार ३०० कोटीचा निधी नव्याने मंजूर करण्यात आले, जे ९ ऑगस्ट २०२६ रोजी महामंडळाच्या बँक खात्यात जमा झाले. आतापर्यंत चालू आर्थिक वर्षात एकूण ४५० कोटीचा  निधी महामंडळास प्राप्त झाला आहे. तसेच १० ऑगस्ट २०२६ रोजी एकाच दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात २१ कोटींचा व्याज परतावा जमा करण्यात आला आहे.

उर्वरित लाभार्थ्यांसाठी कार्यवाही सुरू

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित पात्र आणि प्रलंबित प्रकरणांची प्रशासकीय व तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच उर्वरित रक्कमही कोणत्याही मध्यस्थाविना थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाणार आहे. यामुळे राज्यातील मराठा व आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील नवउद्योजकांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे, असेही महामंडळाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

 

टिप्पण्या