महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये चालले हजारो अकोलेकर

 

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती अर्थात जलसंधारण दिन

महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये चालले हजारो अकोलेकर                                                                                                                                                                                                                                                                                 

                                                                                                                                                                                                                                        

 माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

 

 ‘महा वॉकेथॉन’ला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

 

 

अकोला, दि. २१   : जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे माती आणि पाण्याची बचत, संवर्धन करण्यासाठी मृद व जलसंधारणतर्फे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.

मृद व जलसंधारण विभागातर्फे माजी मुख्यमंत्री  स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ ला अकोला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना,  महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महेश परंडेकर, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल मस्कर, जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

 

जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यासाठी स्व. सुधाकरराव नाईक यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून जलसंवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, माय भारत, नेहरू युवा केंद्र, होमगार्ड, विविध क्रीडा संस्था, व्यायामशाळा, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

उपक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी झुंबा व वॉर्म अप सरावाने सहभागींमध्ये उत्साह जागवण्यात आला. उपक्रमात प्रथम क्रमांक रूपेश गुम्मे व द्वितीय क्रमांक मनोज गोटे यांनी पटकावला.

उपस्थितांनी घेतली जलसंवर्धनाची शपथ

कार्यक्रमात सहभागी मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संदेशातून जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविण्याचा संकल्प करण्यात आला.

 

 

 

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

जलसंधारण सप्ताहानिमित्त आयोजित मृद व जलसंवर्धन विषयावरील रील्स स्पर्धेच्या प्रवेशिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. युवकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

विविध घटकांचा मोठ्या संख्येने सहभाग

 

महा वॉकेथॉनमध्ये विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, माय भारत, नेहरू युवा केंद्र, होमगार्ड, विविध क्रीडा संस्था, व्यायामशाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

 

महा वॉकेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी जलसंधारण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. विविध विभागांच्या समन्वयातून आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून जलसंवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यात आला.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन