जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीत सहभागी होण्याची संधी ; इच्छुकांकडून अर्ज आमंत्रित
जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीत सहभागी होण्याची संधी ;
· इच्छुकांकडून अर्ज आमंत्रित
अकोला,दि. १७ : प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम, १९६० च्या कलम ४ च्या अन्वये महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती स्थापन केली आहे. प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणारे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी तसेच प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी सदस्यांनी मिळून ही समिती स्थापन केल्या जाते. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. या समितीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले परिपूर्ण अर्ज योग्य त्या कागदपत्रासह (आधार कार्ड व बायोडाटा) १ सप्टेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या नियम ३(२) (i) आणि (ii) अन्वये इतर ११ अशासकीय सदस्यांची नियुक्ती दर तीन वर्षांनी करण्यात येते. तसेच अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहतो. अशासकीय सदस्यांची नियुक्ती ही जिल्हाधिकारी यांचे मार्फत प्राप्त झालेल्या शिफारशी विचारात घेऊन राज्य शासनाकडून नामनिर्देशनाने करण्यात येते. अशासकीय सदस्यांमध्ये संबंधित जिल्ह्यातील गोशाला किंवा पांजरापोळ संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याण कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, तसेच सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित दोन व्यक्ती यांचा समावेश असतो. याशिवाय, मानव हितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे किंवा प्राणी कल्याणासाठी काम करणारे पाच ते सहा कार्यकर्ते देखील समितीत सहभागी होऊ शकतात.
या समितीत सहभागी होण्यास इच्छुक कार्यकर्ते सातत्याने यासाठी अर्ज सादर करू शकतात. अर्जाचा नमुना जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, अकोला कार्यालयातून मिळेल. अर्जासह आधार कार्ड आणि बायोडाटा जमा करणे आवश्यक राहील. सर्व समाजातील कार्यकर्त्यांना प्राणी कल्याणासाठी कार्यरत होण्याची ही सुवर्णसंधी असल्याने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा