थेंब थेंब जपूया, गावे जलसमृद्ध करूया! (लेख)
थेंब थेंब जपूया, गावे जलसमृद्ध करूया!
पर्जन्यमानाची अनिश्चितता पाहता पाण्याची बचत ही काळाची गरज झाली आहे. पाऊस अनियमित पडणे, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस होणे आणि पडलेले पाणी वाहून जाणे हीदेखील मोठी आव्हाने आहेत. अशा काळात पाण्याची जपणूक हा दिनचर्येचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे.
पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे आणि भूजलपातळी वाढवणे आवश्यक आहे. जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची नव्हे तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पाण्याच्या योग्य वापरातून बचत साधता येते. त्याचप्रमाणे, गावातील नाले, ओढे, तलाव आणि जलस्रोत जपणे आवश्यक आहे.
मृदा व पाण्याची बचत सर्वांनी अंगीकारली पाहिजे. पाणी बचतीची सुरूवात स्वत:पासून, घरापासून केली तर परिसर, गाव, शहर अशी ही कृती व्यापक होत जाते. याच उद्देशाने जनजागृतीसाठी मृद व जलसंधारण विभागातर्फे महावॉकेथॉन आणि रीळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महावॉकेथॉन हा केवळ चालण्याचा कार्यक्रम नाही. तो जलजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. या माध्यमातून मृदा आणि पाणी वाचविण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जमिनीत मुरविणे ही काळाची गरज आहे. तसेच पाण्याची बचतही आवश्यक आहे, हा संदेश महावॉकेथॉनमधून दिला जाणार आहे. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हेच या उपक्रमाचे ब्रीद आहे.
या उपक्रमात युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. आजचा युवक सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. त्यामुळे जलसंधारणाचा संदेश युवकांच्या सर्जनशीलतेतून समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी रीळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पाणी बचत, जलसंधारण, जलस्रोतांचे संवर्धन, पावसाचे पाणी साठवणूक, लोकसहभाग आणि आपल्या गावातील जलसंधारणाची कामे या विषयांवर सहभागी रीळ तयार करू शकतात.
रीळ स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या सहभागींसाठी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. जिल्हानिहाय आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच उल्लेखनीय रील असल्यास प्रोत्साहनपर पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा केवळ बक्षिसासाठी नाही. आपल्या कल्पनेतून समाजात जलजागृती निर्माण करण्याची ही संधी आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून तयार झालेली एक चांगली रीळ हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे प्रत्येक युवकाने या स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे मांडावा.
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांसोबत लोकसहभागाची गरज आहे. प्रत्येक घराने पाण्याचा ताळेबंद समजून घेतला पाहिजे. उपलब्ध पाणी किती आहे, त्याचा वापर किती आहे आणि भविष्यासाठी किती पाणी साठवता येईल याचा विचार केला पाहिजे. पाणी जपण्याची सवय घरापासून सुरू झाली पाहिजे.
आज अडवलेला पावसाचा थेंब उद्या एखाद्या शेतकऱ्याच्या शेताला पाणी देऊ शकतो. आज केलेले जलसंधारणाचे काम उद्याच्या पिढीला सुरक्षित पाणी देऊ शकते. त्यामुळे जलसंधारण ही केवळ आजची गरज नाही. ती महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे.
महावॉकेथॉनमधील प्रत्येक पाऊल जलसंधारणाचा संदेश देणारे असावे. रीळ स्पर्धेतील प्रत्येक व्हिडिओ मृदा आणि पाणी वाचविण्याची प्रेरणा देणारा असावा. गावागावातील लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहावी.
चला, पाण्यासाठी एकत्र येऊया. चला, जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनवूया. चला, थेंब थेंब जपूया आणि महाराष्ट्राला जलसमृद्ध करूया!
महावॉकेथॉनमध्ये सहभागी व्हा. रीळ स्पर्धेत सहभागी व्हा. जलसंधारणाचा संदेश द्या आणि जलसमृद्ध अकोल्याच्या निर्मितीत आपला वाटा उचला. #Save Soil, Save Water, Secure Tomorrow
- जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा