सामाजिक उत्तरदायित्वातून शासकीय आरोग्यसेवेला बळ ; अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयाला सीएसआर निधीतून ६ एरोटर प्राप्त !
सामाजिक उत्तरदायित्वातून शासकीय आरोग्यसेवेला बळ ;
अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयाला सीएसआर निधीतून ६ एरोटर प्राप्त !
अकोला, दि. २४ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील दंत रोगशास्त्र विभागातील रुग्णसेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईच्या व्हीआपी इंडस्ट्रीज लिमीटेड यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीअंतर्गत रुग्णालयातील तांत्रिक बिघाड झालेले ६ एरोटर दुरुस्त करून रुग्णालयाला देणगी स्वरूपात पुन्हा सुस्थितीत उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी दिली आहे.
दंत उपचारांमध्ये 'एरोटर' हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण असून, दातांच्या विविध उपचार प्रक्रियांसाठी त्याचा नियमित वापर केला जातो. या उपकरणांच्या दुरुस्तीमुळे आता गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वेळेत आणि गुणवत्तेचे उपचार मिळणे शक्य होणार आहे.
उपलब्ध संसाधनांचा प्रभावी पुनर्वापर
शासकीय सर्वोपचार रुग्णालय हे अकोला, बुलढाणा, वाशिम आणि परिसरातील जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे तृतीयक आरोग्यसेवा केंद्र आहे. येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. यापूर्वी वापरात असलेल्या एरोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दंत विभागातील उपचार प्रक्रियेत अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन, CSR निधीचा वापर केवळ नवीन उपकरणे खरेदीसाठी न करता, उपलब्ध साधनसामग्रीची दुरुस्ती करून ती पुन्हा कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमामुळे "उपलब्ध संसाधनांचा प्रभावी पुनर्वापर आणि रुग्णसेवा बळकटीकरण" या संकल्पनेला बळ मिळाले आहे.
देणगीदारांचे आभार व प्रशासनाचे आवाहन
आदर्श संस्कार मंडळ आणि भारत विकास परिषदेच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या योगदानाबद्दल श्री. मुकेश मेर, श्री. विक्रम परमार, श्री. विशाल तडस, श्री. ओम जसवाणी, डॉ. विजय शर्मा आणि श्री. सुशील लटूरिया या CSR देणगीदारांचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही रुग्णालयातील पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी अशाच सहकार्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी - डॉ. संजय सोनुने (मा. अधिष्ठाता), डॉ. प्रवीण सपकाळ (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. दिनेश नैताम (विभागप्रमुख, दंत रोगशास्त्र), डॉ. गौरव पिंपळे, श्री. अमोल शेंडे (समाजसेवा अधीक्षक व CSR समन्वयक) श्री. विनायक मोहन साखरे या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य आणि नियोजन लाभले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा