डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'शिवार फेरी'चा शुभारंभ शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधन व मार्गदर्शन करावे - केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी
अकोला, दि. २९ : शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढण्यासाठी उत्पादनखर्चात घट, उत्पादनात वाढ व शेतमालाला भाव मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक बाजारपेठेचा वेध घेऊन पीक पद्धतीत बदल, शेतीत विकसित वाणाचा अवलंब व्हावा. यादृष्टीने संशोधन व सातत्यपूर्ण मार्गदर्शनासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आजपासून १ ऑक्टोबरपर्यंत तीनदिवसीय शिवार फेरी व थेट पीक प्रात्यक्षिकांचे उद्घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, विप्लव बाजोरिया, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मंत्री श्री. गडकरी यांनी शिवार पाहणी व विविध पीक प्रात्यक्षिकांचे अवलोकन करून तज्ज्ञांकडून विविध पिकांवरील संशोधनाची माहिती घेतली. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांच...