आरोग्य उपक्रमांना जिल्ह्यात प्रारंभ; पहिल्या दिवशी ४६८४ विद्यार्थ्यांची तपासणी जिल्हाभरात ५ लाख ७० हजार ९४९ बालकांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन














अकोला,दि. (जिमाका)- नागरिकांच्या आरोग्यासाठी आजपासून राज्यात रक्तदान शिबिर, तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातही या उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला. यात प्रामुख्याने महिला व बालके यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, रक्तदानातही आपले योगदान द्यावे,असे आवाहन उपसंचालक आरोग्य डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. दरम्यान आरोग्य तपासणी उपक्रमाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ४६८४ शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

आयएमए हॉल येथे जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास आरोग्य यंत्रणेचे सर्व प्रमुख अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आदी मान्यवर तसेच राज्यातील अन्य जिल्हेही सहभागी झाले होते. अकोला येथून आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. मनिष शर्मा, डॉ. सीमा तायडे, डॉ. विशाल काळे, डॉ. आश्विनी खडसे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप चौधरी आदी सहभागी होते.

आय एम ए हॉल येथे रक्तदान शिबिरास डॉ. अनुप चौधरी यांनी स्वतः रक्तदान करुन प्रारंभ केला. रक्तदानात ८४ दात्यांनी रक्तदान केले. तसेच यादिवसापासून ‘जागरुक पालक- सुदृढ बालक’  या अभियानासही सुरुवात करण्यात आली असून शहरातील विद्यालये, शाळा इ. ठिकाणी या अभियानास सुरुवात करुन शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.पहिल्या दिवशी ४६८४ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली. या अभियानात जिल्ह्यात ५६ दिवसांत १७६ आरोग्य पथके ५ लाख ७० हजार ९४९ बालकांची म्हणजेच दररोज  प्रत्येक पथक १५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करेल, असे नियोजन करण्यात आले आहे. स्कुल ऑफ स्कॉलर्स या शाळेत आयोजित आरोग्य तपासणीस आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी भेट दिली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ