तेंदूपानाची संपूर्ण स्वामित्व शुल्क रक्कम मजुरांना

अकोला,दि. ९(जिमाका)- तेंदूपान संकलनातून जमा होणारे संपूर्ण स्वामित्व शुल्क तेंदू पान संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्‍साहनात्‍मक मजुरी म्‍हणून वाटप करण्यात येणार असल्याचे  उपवनसंरक्षक अर्जुना के.आर यांनी कळविले आहे, एका महिन्याच्या आत ही रक्कम अदा करण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तेंदूपान संकलनाचे संपूर्ण स्वामित्व शुल्क तेंदूपान संकलन करणाऱ्या मजूरांना देण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तेंदू पाने संकलनकरिता लिलाव प्रक्रियेतून मिळणाऱ्या स्‍वामित्‍व शुल्‍कातून विविध खर्च  वजा करुन त्‍या हंगामाची तेंदू संकलनकर्त्यांना अदा करावयाची प्रोत्‍साहन मजुरी ठरवण्यात येते. आता सन 2022 च्या हंगामापासून पुढे तेंदूपाने संकलनाद्वारे जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्‍याही प्रकारची वजावट न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्‍साहनात्‍मक मजुरी देण्यात येणार आहे. साधारणपणे एक ते दीड लाख कुटुंबांना तेंदूपाने संकलनाद्वारे जमा होणारी संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्‍याही प्रकारची प्रशासकीय खर्चाची वजावट न करता प्रोत्‍साहनात्‍मक मजुरी म्‍हणून वाटप करण्यात येणार आहे. ही प्रोत्‍साहनात्‍मक मजुरीची रक्कम वन विभागाकडे जमा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित तेंदू मजुरांना देण्यात  येईल. यामुळे उपजिविकेची मर्यादित साधने असलेल्या तेंदू पाने मजुरांच्या उत्पन्नात भर पडणार आहे,असे उपवनसंरक्षक अर्जूना के.आर यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ