‘जागरुक पालक- सुदृढ बालक’ :सर्व यंत्रणांनी समन्वयाने अभियान राबवावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा ; जिल्हाभरात ५ लाख ७० हजार ९४९ बालकांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन

 






अकोला,दि. (जिमाका)- ‘जागरुक पालक- सुदृढ बालक’ अभियानास गुरुवार दि.९ पासून सुरुवात होत आहेत. या अभियानात ० ते १८ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. सर्व सहभागी यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा व अभियान राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले. या अभियानात ५६ दिवसांत १७६ आरोग्य पथके ५ लाख ७० हजार ९४९ बालकांची म्हणजेच दररोज  प्रत्येक पथक १५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करेल, असे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

‘जागरुक पालक- सुदृढ बालक’ अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा आज नियोजन भवनातील बैठकीत घेण्यात आला.बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. वैशाली ठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. मनिष शर्मा, डॉ. सीमा तायडे, डॉ. विशाल काळे, डॉ. आश्विनी खडसे, तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

१७६ पथके,३६०८ शाळा, ५ लाख ७० हजार ९४९ विद्यार्थी

जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागातील शून्य ते १८ वर्षे वयोगटातील  बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य तपासणी, उपचारांसोबत प्रतिबंधात्मक  आरोग्य सुविधा, समुपदेशन आदी सुविधा देण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ५६ दिवसांचा कालावधी आहे. त्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाची १९, सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची  १२५, नागरी आरोग्य केंद्रांची १२, आरोग्य उपकेंद्रांची २० अशी एकूण १७६ पथके तयार करण्यात आली आहेत. शासकीय अंगवाडी, बालवाडी, खाजगी नर्सरी, शाळा, शाळा बाह्य विद्यार्थी, बालगृहे, दिव्यांगांच्या शाळा अशा एकूण ३६०८ शाळा-संस्थांमध्ये या तपासण्या होतील. त्यात एकूण ५ लाख ७० हजार ९४९ विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन आहे. प्रत्येक पथकाने एका दिवसात किमान १५० बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्ट्य आहे. या सर्व पथकांसमवेत आशा व अंगणवाडी सेविकाही सहभागी असतील.

तपासणी ते उपचाराचे नियोजन

प्रथमस्तर तपासणीत वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एलएचव्ही, आरोग्य सहायक यांच्यास्तरावर तपासणी होईल.आवश्यकता भासल्यास दुसऱ्यास्तरावर  वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ज्ञ, भिषक, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, नेत्र चिकित्सा अधिकारी, दंतरोग तज्ज्ञ यांच्या स्तरावर तपासण्या व उपचार होतील. पुढील टप्प्यात आवश्यकता भासल्यास बालकास संदर्भसेवा, उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया इ. सेवा दिल्या जातील.

अशा होतील तपासण्या

या अभियानात बालकाची संपूर्ण आरोग्य तपासणी होईल. वजन उंची नुसार बालकाची सुदृढता मोजली जाईल, जन्मजात व्यंग असल्यास ते तपासणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सि इ. आजारांचे संशयित रुग्ण ओळखून त्यांना संदर्भित केले जाईल. याशिवाय ऑटीझम, विकासात्मक विलंब  इ. मानसिक स्वरुपाच्या आजारांवरही उपचार केले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ