दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी


अकोला,दि.17(जिमाका)-  इयत्ता 12 वी अर्थात उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 फेब्रुवारी तर इयत्ता 10 वी अर्थात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 2 मार्च पासून सुरु होत आहे. जिल्ह्यातील इयत्ता 12 वी चे 86 केंद्रावर तर इयत्ता 10 वीचे 121 केंद्रावर परिक्षा होणार आहे. ही परीक्षा  शांत व सुरक्षित वातावरणात पार पाडावी यासाठी  सर्व परीक्षा केंद्र परिसरात  प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

            यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटल्यानुसार  परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये इयत्ता बारावीच्या 86 परिक्षा केंद्रावर तसेच इयत्ता दहावीच्या 121 परिक्षा केंद्रावर मंगळवार दि. 21 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत सकाळी 8 ते संध्या 6 वाजेपर्यात परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

 आदेशात नमूद केल्यानुसार या सर्व  परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीतरित्या प्रवेश करणे,  परीक्षा केंद्र परिसरात घोषणा देणे,  परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य  व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल, फोन, सेल्युलर फोन ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करावे. उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचेबाबत परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ