परीक्षा १० वी-१२ वीची; तयारी प्रशासनाची: प्रत्येक केंद्रावर ‘बैठे पथक’तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


अकोला,दि.१४ (जिमाका)-  इयत्ता १२ वी अर्थात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. २१ फेब्रुवारी तर इयत्ता १० वी अर्थात माध्यमिक शालांत परीक्षा दि.२ मार्च पासून सुरु होत आहे. या दोन्ही परीक्षांसाठी प्रशासनाची सज्जत्ता आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन शासकीय कर्मचाऱ्यांचे बैठे पथक नियुक्त करण्यात येईल. परीक्षा ‘कॉपीमुक्त’ होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून या प्रयत्नात पालक व विद्यार्थी वर्गानेही सहकार्य द्यावे,असे आवाहन जिल्हाशिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी केले आहे

२०७ केंद्र आणि ४९ हजार ६०५ परीक्षार्थी

शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात इयत्ता १२ वी ची परीक्षा  ८६ केंद्रावर होणार असून २४ हजार ५५५ परीक्षार्थी ह्या परीक्षेत प्रविष्ठ होत आहेत. इयत्ता १० वी परीक्षा १२१ केंद्रावर होणार आहे.२५ हजार ०५० विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. इयत्ता १० व इयत्ता १२ वी मिळून जिल्ह्यात २०७ केंद्रांवर ४९ हजार ६०५ परीक्षार्थी परीक्षा देतील.

‘कॉपीमुक्त’ साठी सज्जता

 या परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विभागीय मंडळाकडून ११ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षाकेंद्रावर केंद्रसंचालकांची नेमणूक करण्यात आली आहे.  तसेच जिल्ह्यात एकूण पाच भरारी पथकाची नेमणूक मंडळाकडून करण्यात आली आहे. इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात करण्याचे निर्देश शालेय शिक्षण सचिव व जिल्हाधिकारी यांनी  दिले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक  परीक्षा केंद्रावर बैठे पथक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने परिक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी केले आहे.

दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिकांचे वितरण सुविधा रद्द

इयत्ता १० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या १० मिनिटे आधी वितरीत करण्यात येत. मात्र यंदापासून ही सुविधा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिली आहे. १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरीत न करता त्या थेट परीक्षेच्या वेळी म्हणजेच सकाळच्या सत्रात ११ वा. आणि दुपारच्या सत्रात दुपारी तीन वा. वितरीत करण्यात येतील.  ज्या क्रमाने परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल त्याच क्रमाने परीक्षा कालावधी संपल्यावर उत्तरपत्रिका गोळा करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले असून तशा सुचना  दालन पर्यवेक्षक, परिरक्षक व केंद्रसंचालक यांना देण्यात आल्या आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ