डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ आज;४३२७ जणांना होईल पदवीदान




अकोला,दि. (जिमाका)- येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ रविवार दि.५ रोजी होणार आहे. या समारंभात विविध पदवी अभ्यासक्रम यशस्वीपणे उत्तीर्ण करणाऱ्या ४३२७ जणांना पदवीदान केले जाणार आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

            डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३७ वा पदवीदान समारंभ रविवार दि.५ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी  १० वा. होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज शेतकरी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेस कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी संबोधित केले. याप्रसंगी  कुलसचिव     डॉ. सुरेंद्र काळबांडे, संचालक विस्तार शिक्षण  डॉ. धनराज उंदिरवाडे, डॉ. धनवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदी उपस्थित होते.

            उपस्थितांना माहिती देण्यात आली की,  या सोहळ्यास राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी,  प्रतीकुलपती तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे मजी उपमहासंचालक  डॉ. नरेंद्र सिंह राठोर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  या सोहळ्यात कृषी विद्याशाखा, कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम व आचार्य अशा एकूण ४३२७ पदव्यांचे पदवीदान केले जाणार आहे. दीक्षांत समारंभात ३० आचार्य पदवीधारक, २३ स्नातकोत्तर तर १९२२ पदवीपूर्व पदवीधारक  हे समारंभात उपस्थित राहून  पदवी प्राप्त करतील.

या सोहळ्यास उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ३१ विद्यार्थ्यांनी यशसंपादन करीत सुवर्णपदक, १६ जणांनी रौप्य पदक  तर रोख स्वरुपातील ३१ पारितोषिके प्राप्त केली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आगामी काळात विद्यापीठातील संशोधन हे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच त्यामाध्यमातून शेतीचा विकास करणे आदी उपक्रमांचा चालना देण्यात येईल. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ११ जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव प्रमाणे ११ गाव मॉडले व्हिलेज म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील तिवसा ता. बार्शी टाकळी हे गाव मॉडेल व्हिलेज विकसित करण्यासाठी विद्यापीठाने निवडले असून याठिकाणी शेती व ग्राम विकासाचे उपक्रम विद्यापीठाच्या पुढाकारातून राबविले जातील,असेही कुलगुरु डॉ. गडाख यांनी सांगितले.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम