गुरुवार (दि.९) पासून आरोग्य,रक्तदान शिबिरे; महिला, बालकांचीही होणार तपासणी

 अकोला,दि. (जिमाका)- जिल्हाभरात गुरुवार दि.९ पासून आरोग्य, रक्तदान,स्त्रिया व बालकांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित होणार असून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’, या मोहिमेचा दुसरा टप्पाही (दि.८  ते दि.२२) सुरु होत आहे. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी,चाचण्या,उपचार केले जातील. या शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे.

आरोग्य विभागामार्फत राज्यभरात हे आयोजन असून जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणेमार्फत जय्यत तयारी सुरु आहे. अधिक माहिती अशी की, गुरुवार दि.९ रोजी सर्व आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य शिबिरांचे तसेच महारक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम आयएमए हॉल अकोला येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिली.

महाआरोग्य शिबिरे ही जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात येतील.  तसेच महारक्तदान शिबिरे ही जिल्ह्यात चार खाजगी  तसेच दोन शासकीय रक्तपेढ्यामार्फत राबविली जातील. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला व जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील शासकीय रक्तपेढ्या तर  अन्य चार खाजगी रक्तपेढ्या सहभागी होतील. उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर, ग्रामिण रुग्णालय बार्शी टाकळी, अकोट, बाळापूर, तेल्हारा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे  तसेच जिल्हास्तरावर आयएमए हॉल येथे रक्तदान शिबिरे होतील.

‘जागरुक पालक-सुदृढ बालक’ अभियान

याच अनुषंगाने ‘जागरुक पालक-सुदृढ बालक’ अभियान राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम येते आठ आठवडे चालणार आहेत. याअंतर्गत सर्व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. जिल्ह्यात वय वर्षे ६ ते १८ वयोगटातील  ९९८ शासकीय शाळांमधील १ लाख ८१ हजार ४८१, अनुदानित ४५९ शाळांमधील १ लाख ६० हजार २५३, खाजगी ३७३ शाळांमधील  ९२ हजार ७२, दिव्यांगांच्या आठ शाळांमधील ३९०, जिल्ह्यातील चार बालगृहांमधील १५२, तर २७ आश्रमशाळांमधील ५९६२ अशा एकूण ४ लाख ४० हजार ३१० विद्यार्थ्यांची  तसेच शाळाबाह्य असणाऱ्या १९७ बालकांची आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच शून्य ते ६ या वयोगटात १६१४ अंगणवाड्यांमधील १ लाख २१ हजार ९७७, खाजगी १२५ नर्सरी- बालवाड्यांमधील ८६६२ अशा एकूण १ लाख ३० हजार ६३९ व अंगणवाडीबाह्य २२ बालकांची आरोग्य तपासणी केली जाईल. आरोग्य पथके सर्व शाळांमध्ये जाऊन तपासण्या करतील.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिम

या मोहिमेअंतर्गत १८ वर्षे वयावरील स्त्रियांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दि.२४ जानेवारी पासून स्त्रियांच्या तपासण्या सुरु आहेत. गर्भवती मातांची तपासणी, रक्तक्षय उपचार, थायोरॉईड असे विविध उपचार करण्यात येतील. दि.८ ते दि.२२ फेब्रुवारी पर्यंत ‘असंसर्गिक आजार’ पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्यात ३० वर्षे वयावरील महिलांच्या आरोग्य तपासण्या होतील. त्यात कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब इ. आजारांच्या तपासण्या होतील. आवश्यकतेनुसार पॅथॉलॉजिकल चाचण्याही केल्या जातील. पुढील टप्प्यात दि.२३ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत अंतिम निदान झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया इ. उपचार केले जातील. त्यात मोतिबिंदू सारख्या शस्त्रक्रियांचाही समावेश असेल. या प्रक्रियेत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत संलग्न असणारे रुग्णालयेही सहभागी असतील.

 या सर्व शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासण्या होतील. औषधोपचार, शस्त्रक्रिया उपचार, वैद्यकीय चाचण्या इ. कोणत्याही प्रकारच्या तपासण्या, औषधे सर्व विनामूल्य असतील. या उपक्रमासाठी आयएमए, आयएपी, निमा, हिम्पा, जीपीए अशा सर्व डॉक्टरांच्या संघटनाही सहाय्य करणार आहेत, अशी माहिती डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ