बाळापूर येथे सर्वेक्षण पूर्ण; आजपासून (दि.२६) तपासण्या सुरु


अकोला,दि.२५(जिमाका)- बाळापूर येथे कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाळापूर शहर परिसरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आता उद्या म्हणजेच शुक्रवार दि.२६ पासून सर्वेक्षणात आढळलेले जोखमीचे व अन्य व्याधींनीग्रस्त लोकांच्या आरोग्य तपासणीस सुरुवात होणार आहे, अशी माहिती तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली.
 बाळापुर येथे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येताच तेथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बाळापूर शहरात  आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४४ हजार लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी २४ पथके तयार करण्यात आले होते. या सर्वेक्षणात  जोखमीचे असणारे ६४७ व्यक्ती व ३१२ हे अन्य व्याधींनीग्रस्त असणारे  लोक आहेत. आता उद्या (शुक्रवार दि.२६) पासून या लोकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यात त्यांचे ऑक्सिजन पातळी, ताप, व अन्य  आवश्यक तपासण्या केल्या जातील. तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही आवश्यक उपाययोजना करुन  तेथील जोखमीचे व निकट संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात येणार आहे. तसेच जोखमीच्या व्यक्तिंवर दररोज लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या मोहिमेसाठी उपविभागीय अधिकारी रमेश पवार, मुख्याधिकारी गोपिचंद पवार,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. इशरत यांच्या मार्गदर्शनात पथके नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ