शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना. बच्चू कडू यांची भेट


अकोला,दि.१०(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज सकाळी कोविड रुग्णांवर उपचार होत असलेल्या  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख,  प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, डॉ. शिरसाम तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था,  स्वच्छता व्यवस्था, कोवीड वार्डातील रुग्णांना दिले जाणारे चहा, नाश्ता भोजन व्यवस्था यांची पाहणी केली. प्रत्यक्ष स्वतः चहा पिऊन  चाचणी घेतली. या चहा मध्ये आलं अवश्य घालावे, अशी सुचनाही त्यांनी प्रशासनाला केली. तसेच जेवणाचा दर्जा उत्तम व  आहारमानकांनुसार असावा अशी सुचना केली.  तसेच जेवणासाठी प्लस्टीक कोटेड वा कागदी पत्रावळी न वापरता नैसर्गिक पानांच्या पत्रावळी वापराव्या अशी सुचना केली. या सुचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी  संबंधितांना दिले.  तसेच सकाळी सात वाजेपर्यंत चहा दिला जावा. आठ वाजता नाश्ता व १२ वाजेपर्यंत जेवण या वेळांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे सर्व प्रक्रियेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी  दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व परिसराची स्वच्छता उत्तम राखली जावी. इथले वातावरण आल्हाददायक असावे, त्यासाठी सर्व आधुनिक व्यवस्थांचा वापर करा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,असेही त्यांनी निर्देशित केले.
पीकेव्ही मधील सेवांबद्दल प्रशासनाचे केले कौतूक
त्यानंतर पालकमंत्री ना. कडू हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील  कोविड केअर सेंटर मधील  निरीक्षणाखालील रुग्णांची भेट घेऊन पाहणी करण्यासाठी गेले. तेथे त्यांची रुग्णांची विचारपूस करुन प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी इथं दिल्या जाणाऱ्या सेवा, जेवण, जेवणाचा दर्जा , स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा ह्या उत्तम असल्याचे सांगितले. यावेळी दाखल रुग्ण व निरीक्षणाखालील रुग्ण यांची माहितीही ना. कडू यांना सांगण्यात आली.  इथं दिल्या जात असलेल्या सेवांबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे कौतूकही केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ