शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

अकोला,दि.१८(जिमाका)-  शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करण्यासाठी शासनाने सविस्तर निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यातील शाळा त्याच पद्धतीने सुरु करण्यासाठी  शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करण्याबाबत नियोजन करण्यासाठी  आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. वैशाली ठग,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी  सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी   फडके तसेच सर्व उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी  शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ सुरु करण्याबाबत शासनाने  दि.१५ जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकाची माहिती देण्यात आली. त्यानुसार  शाळा ह्या टप्प्या टप्प्याने सुरु  करतांना प्रथम जुलै महिन्यात इयत्ता ९ वी, १० वी व १२ वी हे वर्ग सुरु होतील. त्यानंतर ऑगस्ट मध्ये इयत्ता सहावी ते आठवी चे वर्ग सुरु होतील. सप्टेंबर मध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी चे वर्ग सुरु होतील. इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग  केव्हा सुरु करायचे याबाबत स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीने  निर्णय घ्यावा. तसेच इयत्ता अकरावीचे वर्ग हे  इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  सुरु करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापनाने  पूर्व तयारी पंधरवडा राबवावयाचा आहे. त्यात शाळा व्यवस्थापन समितीची (ऑनलाईन) सभा आयोजित करणे, पाठ्यपुस्तक वितरण,  शाळेच्या इमारतीचे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, गटागटाने पालकांच्या सभा घेणे, शाळा बाह्य मुलांच्या घरी भेटी देणे,  शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाचे अद्यावतीकरण करणे. ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर यांची सुविधा उपलब्ध करुन मुलांना मदत करणे,  गुगल क्लासरुम, वेबिनार, डिजीटल शिक्षणासाठी शिक्षक व पालकांचे सक्षमीकरण करणे, दीक्षा ॲपचा प्रसार,  इ-कन्टेंट निर्मिती इ. बाबत तयारी करण्यात येणार आहे.
या पद्धतीने सर्वअंमलबजावणी करण्यासाठी  सर्व शिक्षकांनी दि.२६ जून रोजी हजर व्हावे. हजर होतांना त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे यावेळी सांगण्यात आले.  जेथे नियुक्ती आहे तेथेच शिक्षकांनी  रहावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ