कोवीड १९ आढावा बैठक जलद चाचण्यांसाठी रॅपिड टेस्ट किट खरेदी करा- पालकमंत्री ना. कडू यांचे निर्देश


अकोला,दि.२४(जिमाका)- जिल्ह्यातील संदिग्ध व्यक्तिंच्या अधिकाधिक चाचण्या जलद करता याव्यात यासाठी दहा हजार रॅपिड टेस्ट किट खरेदी करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्ह्यातील कोवीड १९ संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, डॉ. एम डी. राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
 यावेळी जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांच्या होत असलेल्या आरोग्य तपासण्या व थेट त्या त्या भागात जाऊन घशातील स्त्रावांचे संकलन यामुळे चाचण्यांची  संख्या वाढत असल्याची माहिती देण्यात आली. येत्या काळात व्यक्तीचे वय, त्याला असणारे अन्य आजार यानुसार चाचणीचा प्राधान्य क्रम ठरवावा, अशी सुचना ना. कडू यांनी केली.  ६० वर्षावरील वय, त्यासोबत मधुमेह, दमा, श्वसनाचे आजार,  उच्च रक्तदाब इ. सारखे आजार असणे अशी लक्षणे असल्यास चाचण्या कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. येत्या काळात चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी रॅपिड टेस्ट किट खरेदी करुन त्यामाध्यमातून लवकर चाचणीचा अहवाल मिळेल. त्यासाठी जिल्ह्यात चाचणी करण्यासाठी १० हजार रॅपिड टेस्ट किट खरेदी करण्याची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी यांनी सांगितले की, या टेस्ट किट मुळे अर्धा तासात चाचणी अहवाल मिळेल.  तसेच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता वाढीव बेडसची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती ही यावेळी देण्यात आली.  अकोला शहरात लोकांच्या आरोग्य तपासण्या व संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी  नियोजन बद्ध पद्धतीने मोहिम राबवा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ