स्वच्छतेचे योद्धा!


अकोला,दि.१४(जिमाका)-  कोरोना विरुद्धच्या लढाईत, प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देत आहेत.  कुणी अन्नदान केले, कुणी वैद्यकीय सेवा देतायेत, कुणी  लोकांना ये जा करण्यासाठी मदत करतायेत. मात्र अकोल्याचेच सुपूत्र असणाऱ्या काही युवकांनी  स्वच्छतेच्या सेवेचा विडा उचललाय. तो ही  कोविड केअर सेंटरच्या परिसरात.
कोविड केअर सेंटर येथे संदिग्ध व ज्यांना निरीक्षणात ठेवावयाचे आहेत असे सौम्य लक्षणांनी युक्त पॉझिटीव्ह रुग्ण ठेवले जातात. त्यामुळे म्हणावे तर सारेच संसर्गाच्या सावटाखाली. अशा ठिकाणी  परिसर स्वच्छता व अन्य लहान मोठी अस्वच्छ कामे करण्यासाठी कुणी सहजासहजी तयार होत नाही. पण येथे ही एक युवकांची टिम परिसर स्वच्छतेचे काम करते. नियमितपणे.  त्यांचा सेवाभाव पाहून त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदलाही प्रशासनाने देऊ केलाय. पण हा मोबदला हा काही त्यांच्या कामाची किंमत नव्हे. त्यांच्या सेवाभावाची आणि स्वतःहून पुढे येऊन काम करण्याच्या  वृत्तीचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे.  उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे यांनी या युवकांना प्रोत्साहित करीत त्यांना तेथे जवळच वेगळे राहण्याची व्यवस्थाही करुन दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनीही या युवकांना प्रोत्साहन दिले. स्वच्छतेसाठी त्यांना पुरेसे सुरक्षा साहित्य (ग्लोव्हज, मास्क, फेस शिल्ड,सॅनिटायझर इ.) पुरविण्यात येते. हे युवक या भागात रुग्णांच्या दैनंदिन वस्तू वापरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची स्वच्छता करुन हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे येथील वातावरणही प्रसन्न भासू लागले आहे. करण लोहोरे, सुर्यभान कोरी, कशिन शर्मा, गौरव खरे, मनिष पथरोडीया, सागर घरमुडे, शेषराव तायडे, सुरज तायडे, आनंद चिंतामण, जितू गागापांग, सोनू खरारे ही या स्वच्छता योद्ध्यांच्या पथकातील युवकांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व जण अकोल्याचेच सुपूत्र आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ