राजनापूर खिनखीनी येथे विकास कामांचा आढावा: गावाच्या विकासासाठी रोजगार निर्मितीस प्राधान्य द्या- ना.बच्चू कडू


अकोला,दि.१६(जिमाका)- गावाच्या विकासासाठी प्राप्त होणारा निधी खर्च करतांना रोजगार निर्मितीवर भर द्या. त्यातही भूमिहीन, कोरडवाहू, अल्प भूधारक शेतकरी, दिव्यांग, विधवा,परितक्त्या महिला अशा सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज राजनापूर खिनखी नी येथे दिले.
यावेळी गावाचे स्मार्ट व्हिलेज अंतर्गत प्राप्त १० लाख रुपयांच्या प्राप्त निधीचा धनादेश ना.कडू यांच्या हस्ते सरपंच प्रगती रुपेश कडू यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.
राजनापुर खिनखीनी येथे आज ना.कडू यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सरपंच प्रगती रुपेश कडू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, सहायक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर,शाखा अभियंता जी.एम. मसने, उपविभागीय कृषी अधिकारी अ.दे. कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी ए. ए. काळे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गावातील टंचाई नळ दुरुस्ती मधून चार लक्ष १७ हजार ८१० रुपये, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १८ लक्ष रुपये,व्यायाम शाळेसाठी सात लक्ष रुपये, गावातील अंतर्गत रस्ते गटारी यासाठी १५ लक्ष रुपये, स्मार्ट व्हिलेज प्रकल्पासाठी १० लक्ष रुपये, आर ओ प्लांट साठी पाण्याची टाकी १७ लक्ष रुपये, स्मशानभूमीचे कुंपण व सौंदर्यीकरण करण्यासाठी १० लाख रुपयांच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच गावातील रेशनकार्ड ,संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अधिवास प्रमाणपत्र, प्राचीन मंदिरासमोरील विहीर दुरुस्तीकरण व खोलीकरण, घरकुल प्रकरणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, दिव्यांग योजना, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अतिरिक्त वर्ग घेणे, शेळी पालन,कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय शिवणकाम याबाबत २० बचत गटांना प्रशिक्षण, गावकऱ्यांचे पीक विमा योजना प्रकरणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, शिवकालीन तलाव दुरुस्ती व अन्य कामे याबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी गावातील वृक्ष लागवडीचा आढावा घेणे, तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्रव संदर्भात तक्रारीच्या निराकरणासाठी ५०हेक्टर चे वनक्षेत्र कुंपण बंदिस्त करा, वन हक्क समिती गठीत करून गावकऱ्यांना उत्पादन मिळेल यासाठी योजना तयार करण्याचेही निर्देश ना.कडू यांनी दिले. तसेच गावाच्या ग्रामपंचायतीच्या शाश्वत  उत्पन्नासाठी सौर उर्जेवर आधारीत विविध उपक्रम राबविण्यात यावे अशी सुचनाही त्यांनी  केली. त्यानंतर ना.कडू यांनी गावच्या शाळेची, तसेच शिवकालीन तलावाची  पाहणी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ