लग्नसमारंभ आयोजनाबाबत नव्या मार्गदर्शक सुचना; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


        अकोला,दि.२३ (जिमाका)- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने  मिशन बिगीन  फेज १,२ व ३ नुसार जिल्ह्यातील प्रतिबंधित व प्रतिबंध मुक्त करावयाच्या विविध  व्यवसाय, उद्योग व क्षेत्रांबाबत आदेश निर्गमित करण्यात आले असून दि.२२ जून रोजी लग्न समारंभ आयोजना करीता शासनाने नव्याने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश जारी केले आहेत.
शासनाने जारी केलेल्या सुचना-
१.       प्रतिबंधित क्षेत्र वगळून लग्‍न समारंभाकरिता केवळ ५० व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍याची परवानगी अनुज्ञेय राहील.
२.     सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्‍याने लग्‍न समारंभाकरीता खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय/ हॉल/ सभागृह, घर व येथे लग्‍न समारंभ पार पाडता येईल.
लागू असलेल्या अटी-
नियोजीत समारंभाकरीता संबंधीत उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांची परवानगी घेणे व संबंधीत पोलीस स्‍टेशन, मुख्‍याधिकारी, गटविकास अधिकारी यांना  अवगत करणे बंधनकारक राहील, संबंधीत क्षेत्रातील तहसिलदार, मुख्‍याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी कार्यक्रमाचे ठिकाणी आपले अधिनस्‍त पथकामार्फत आवश्‍यक तपासणी करावी, लग्‍न समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व संबंधितांची आरोग्‍य तपासणी करुन कोविड-१९ ची लक्षणे नसल्‍याबाबत नोंदणीकृत शासकीय/ खाजगी वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घेणे अनिवार्य असेल, प्रतिबंधित क्षेत्र म्‍हणून निश्चित केलेल्‍या क्षेत्राकरिता लग्‍न समारंभ अथवा कोणत्‍याही समारंभाची परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. लग्न समारंभाकरिता वापरण्‍यात येणारे वाहन निर्जंतुकीकरण करणे, तसेच चेहऱ्यावर मास्‍क लावणे व सोशल डिस्‍टंसिंगचे नियम पाळणे संबंधितांस बंधनकारक राहील. कोरोना विषाणुचा होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्‍यासाठी तसेच कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहण्‍याचे दृष्‍टीने वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या आदेशांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ