आरोग्य सर्वेक्षणात आढळलेल्या संदिग्ध व्यक्तिंच्या चाचण्या प्राधान्याने पूर्ण करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू


अकोला,दि.१६(जिमाका)- शहरात राबविण्यात आलेल्या घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेत ज्या संदिग्ध व्यक्ती आढळल्या अथवा ज्या व्यक्ती जोखमीच्या वाटतात अशा व्यक्तिंच्या चाचण्या येत्या तीन दिवसांत पूर्ण कराव्या, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीस विधानपरिषद सदस्या आ. अमोल मिटकरी, विधान सभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.  मिनाक्षी गजभिये,  जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डॉ. पवार, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. शिरसाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त आवारे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी  वाढत्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली. वाढता मृत्यू दर कमी करण्यासाठी आणखी चाचण्या करणे आवश्यक आहे. तसेच  वैद्यकीय मानकांनुसार सर्वेक्षणात ज्यांची तब्येत जोखमीची वाटते अशा लोकांचे म्हणजेच ज्यांना पुर्वीचे आजार आहेत, ज्यांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, ज्यांना श्वसनाचा आजार  आहेत, ज्यांचे वय ६० वर्षाच्या वर आहे, अशा लोकांच्या तातडीने चाचण्या होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी  माहिती देण्यात आली की, प्रतिबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण पुर्ण असून ऑक्सिजन पातळी कमी असलेले २१८ व  सर्दी, पडसे, ताप असलेले ७४ व्यक्ती आढळून आले.  प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ६० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात ऑक्सिजन पातळी कमी असलेले ४४०  व्यक्ती आढळून आले आहेत.  अशा सर्व लोकांच्या चाचण्या करण्यात याव्या असे निर्देश ना. कडू यांनी दिले. समाजामध्ये नकारात्मक भावना ही घातक आहे, ती घालविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्या अशी सुचना त्यांनी दिल्या.
वाढत्या रुग्णसंख्या पाहता  रुग्णांच्या व्यवस्थेबाबतही माहिती देण्यात आली. तसेच त्यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे पुरेसे नियोजन करावे. आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने  वेळीच पुरविण्यात यावी. दाखल रुग्णाना देण्यात येणारे  जेवणाचा दर्जा उत्तम राखा, त्यांना अधिक पौष्टिक आहार देता येईल का याबाबत विचार करावा, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ