‘आरोग्यसेतू’चा वापर जनता आणि प्रशासनाच्या हिताचा-केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांचा दूरचित्रवाणी परिषद संवाद



अकोला,दि.१०(जिमाका)-  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस केलेले आरोग्य सेतू हे मोबाईल ॲप वापरणे हे कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात  जनता व प्रशासन दोहोंच्या हिताचे असून या ॲपच्या वापराला चालना द्यावी, असे निर्देश केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान,  इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री  ना. संजय धोत्रे यांनी देशातील यंत्रणांना दिली. या संदर्भात आज आयोजित दूरचित्रवाणी परिषदेद्वारे ना. धोत्रे यांनी संवाद साधला.
या परिषदेस मार्गदर्शन करतांना ना. धोत्रे यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोन मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केल्यास त्यांना विविध प्रकारचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मार्गदर्शन,  तसेच आपल्या शहरातील संसर्गाची सद्यस्थिती आदी माहिती कळून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.  याबाबत जिल्हा प्रशासनाने घ्यावयाचा सहभाग व त्यासंबंधिचे तांत्रिक मार्गदर्शनही  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले. या परिषदेत राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे,  एनआयसी दिल्लीच्या संचालक  नीता वर्मा,  राज्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री ना. सतेज पाटील यांच्यासह  अकोला, ठाणे,  मुंबई, नाशिक, नागपुर,  औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, जालना येथील जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अकोला जिल्ह्यातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी  नितीन चिंचोले  यांनी या दूरचित्रवाणी परिषदेत सहभाग घेतला.
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६४ हजार ९६६ स्मार्ट फोनधारकांनी  आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केले आहे.  आरोग्य सेतू ॲप बाबत नॉन ॲन्ड्रॉईड फोनधारकही आपला नंबर नोंदवू शकता. त्यासाठी त्यांना १९२१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही  सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ