लेख अकोला पोलीसांची डिजिटल झेप


 लेख

अकोला पोलीसांची डिजिटल झेप

 

डिजिटल सेवांचा वापर वाढवून प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून सातत्याने नवनव्या उपक्रमांची अंमलबजावणी होते. "१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रम" या विशेष मोहिमेतही हा महत्वाचा निकष होता. या मोहिमेत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात 'ई-गव्हर्नन्स' मध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे.

अकोला जिल्हा पोलीस दलाने डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणल्याने  हा बहुमान मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा मुंबई येथे गौरव करण्यात आला.

या मोहिमेत संकेतस्थळाची उभारणी, ‘आपले सरकार’ प्रणालीची अंमलबजावणी, ई-ऑफिसचा वापर, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा यासह कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर हे निकष होते. या सर्व निकषांची अंमलबजावणी करून अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने डिजिटल प्रशासनाची दिशा अधिक ठळक केली आहे.

जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा मिळत आहेत. ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ आणि ‘प्रोजेक्ट रक्षा’ असे त्यात प्रमुख उपक्रम आहेत. ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ हा एआय आधारित प्रकल्प असून, गुन्हे घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. त्यामुळे ‘बॉडी क्राईम’ प्रकारातील गुन्ह्यांमध्ये तब्बल 64 टक्के घट झाली आहे.

तसेच, ‘प्रोजेक्ट रक्षा’ या नागरिक प्रतिसाद प्रणालीद्वारे पोलीस सेवांची गुणवत्ता तपासून आवश्यक सुधारणा करण्यात येतात. यामुळे जिल्ह्याचा नागरिक विश्वास निर्देशांक 10 पैकी 8.9 इतका उत्कृष्ट नोंदवला गेला असून, सार्वजनिक सुरक्षिततेची भावना वाढल्याचे ते द्योतक आहे.

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोला पोलीस दलाने ‘ऑपरेशन प्रहार’ राबवून 8.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय, ‘मिशन उडाण’ अंतर्गत 1800 हून अधिक शाळांमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे.

एकूणच, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर अकोला पोलीस दलाने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच, नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यातही यश मिळवले आहे. त्यामुळे ई-गव्हर्नन्स उपक्रमात त्याची ठळक नोंद घेतली गेली आहे.

-        हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*