आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘अस्मिता लीग’ वसंत देसाई क्रीडांगणावर आयोजन
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘अस्मिता लीग’
वसंत देसाई क्रीडांगणावर आयोजन
अकोला, दि. ५ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘अस्मिता लीग’ दि. ८ मार्च रोजी सकाळी ८.३० वा. वसंत देसाई क्रीडांगणावर होणार आहे. त्यात अधिकाधिक विद्यार्थिनी व महिलाभगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
केंद्र शासनाचे क्रीडा मंत्रालय, मेरा युवा भारत केंद्र यांच्यातर्फे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थिनी व महिलांसाठी १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्ष, १८ हून अधिक अशा तीन वयोगटात १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. सहभागासाठी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ऑफलाईन नोंदणीही सकाळी ७.३० ते ८ वा. पर्यंत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा युवक अधिकारी महेशसिंह शेखावत यांनी दिली.
उपक्रमाच्या पूर्वतयारीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनीही बैठकीद्वारे आढावा घेतला. उपक्रमात अधिकाधिक नोंदणी व्हावी. शाळा- महाविद्यालयांचा सहभाग मिळवावा. क्रीडांगण व्यवस्थापन, ऑफलाईन नोंदणीसाठी बुथ, स्वयंसेवक व्यवस्था, पेयजल, आरोग्य पथक, पोलीस बंदोबस्त आदी व्यवस्था काटेकोरपणे ठेवण्याचे निर्देश विविध यंत्रणांना देण्यात आले.
उपक्रमात जिल्हा क्रीडा कार्यालय, स्काऊट-गाईड कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विविध शाळा-महाविद्यालये, महिला आर्थिक विकास महामंडळ यासह विविध संस्थांचा सहभाग मिळविण्यात आला आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा