‘आधार’ व ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची जिल्हास्तरीय विशेष तपासणी मोहीम
‘आधार’ व ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची
जिल्हास्तरीय विशेष तपासणी
मोहीम
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश; ‘स्विफ्ट अकोला’ प्रणालीद्वारे
डिजिटल पडताळणी
अकोला, दि. २७ : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ‘आपले सरकार’, महासेतू तसेच आधार सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मंडळ अधिकारी स्तरावर डिजिटल माध्यमातून काटेकोर तपासणी केली जात आहे.
नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध
व्हाव्यात, या उद्देशाने अकोला जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला
आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये
सेवा केंद्रांची सखोल पडताळणी सुरू आहे.
या मोहिमेत मंडळ अधिकारी डिजिटल पद्धतीने स्विफ्ट अकोला प्रणालीच्या
(swiftakola.in) माध्यमातून केंद्रांची तपासणी करत आहेत. सेवा केंद्रांमधील कामकाज,
नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता, प्रलंबित अर्जांची स्थिती, तसेच आवश्यक
कागदपत्रांची अचूकता याची बारकाईने पाहणी करण्यात येत आहे.
या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नागरिकांचा थेट सहभाग.
आता जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही ‘आपले सरकार’ किंवा आधार सेवा केंद्राबाबत तक्रार
किंवा अभिप्राय नोंदविण्याची सुविधा स्विफ्ट अकोला या संकेतस्थळावर
(swiftakola.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच, नागरिकांना थेट संपर्कासाठी
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांनी 08065909844 हा दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून
दिला आहे.
या उपक्रमामुळे सेवा वितरणात अधिक पारदर्शकता येण्यास, गैरप्रकारांना
आळा बसण्यास आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित दखल घेण्यास मदत होणार आहे. प्रशासनाच्या
या कारवाईमुळे सेवा केंद्रांच्या कामकाजात शिस्त निर्माण होऊन नागरिकांना वेळेवर व
गुणवत्तापूर्ण सेवा मिळण्यास मोठी चालना मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने भविष्यातही
अशा प्रकारच्या डिजिटल तपासण्या सातत्याने सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
०००

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा