जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य यंत्रणेचा आढावा उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना रूग्णालये सुसज्ज ठेवण्याचे निर्देश
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आरोग्य यंत्रणेचा आढावा
उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा
-
जिल्हाधिकारी वर्षा मीना
रूग्णालये सुसज्ज ठेवण्याचे निर्देश
अकोला, दि. १३ : तापमानाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य
केंद्रांसह सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशी औषधे, उपचार साहित्य उपलब्ध ठेवावे. उष्मालाटेपासून
बचावासाठी आवश्यक दक्षतेबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
जिल्हा संसर्गजन्य आजार प्रतिबंध समिती, नियमित लसीकरण कार्यक्रम, प्राणीजन्य आजार प्रतिबंध समिती, हवामान बदल व मानवी
आरोग्य कार्यक्रम टास्क फोर्स आदी विविध बैठका जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या
दालनात झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे,
माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, डॉ. मेश्राम, महिला व बालविकास अधिकारी
राजश्री कोलखेडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात ४५.२. से. इतके उच्चांकी तापमान
नोंदवले गेले. उष्माघातापासून दक्षता पाळण्याबाबत शेतकरी बांधव, नागरिकांना व्यापक
प्रमाणावर संपर्क साधून जागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. प्रत्येक
आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापण्यात आला असून, उपचार साहित्य, औषधे, आयव्ही फ्लुईड,
ओआरएस साठा उपलब्ध आहे.
उष्माघात उपचाराच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ३०
खाटा, प्रत्येक प्रा. आ. केंद्रात २ खाटा, प्रत्येक ग्रामीण रूग्णालय ५ खाटा, उपजिल्हा
रूग्णालयात १० खाटा राखीव आहेत.
२०२५ मध्ये काही क्षेत्रात एकूण ११ उद्रेक, साथी उद्भवल्या. त्यात ५
जलजन्य व ६ कीटकजन्य उद्रेक होते. चिकनगुण्याचे १८३, डेंग्यूचे ३०६ व मलेरियाचे १७
रूग्ण आढळले. जलद उपचार, जनजागृतीबरोबरच निर्जंतुकीकरण, जलस्त्रोतांची स्वच्छता आदी
उपाय राबविण्यात आले. हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमात हवाप्रदुषण, उष्मालाट
याबाबत जनजागृती करण्यात आली. पोपटखेड प्रा. आ. केंद्र व बाळापूर ग्रामीण रूग्णालय
येथे हरितीकरण योजनेत सौर ऊर्जा संच बसविण्यात आले.
प्राणीजन्य आजार प्रतिबंध समितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात रेबीज
व लंपी या प्राणीजन्य आजाराचा प्रादुर्भाव यापूर्वी आढळला. श्वानदंशाबरोबरच इतर प्राणीदंशाच्या
केसेस आढळल्या असून, वेळीच उपचार देण्यात आले. रेबीज लस व इम्युलोग्लोबुलिनचा साठा
पुरेसा ठेवण्यात आला आहे.
नियमित लसीकरण कार्यक्रमात बीसीजी ११४ टक्के, हिपॅटायटिस बी ९९ टक्के
व नियमित लसीकरण ९१ टक्के पूर्ण झाले आहे. कायाकल्प कार्यक्रमात पळसो, महान, दाभा,
पोपटखेड पीएचसीचे राष्ट्रीय स्तरांवर मूल्यांकन झाले असून, यंदा पाच संस्थांसाठी प्रक्रिया
सुरू असल्याचे डॉ. करंजीकर यांनी सांगितले.
०००
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा