निक्षयमित्रांचा गौरव; टीबीमुक्तीसाठी १०० दिवसांची मोहिम जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त व्हावा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

 








निक्षयमित्रांचा गौरव; टीबीमुक्तीसाठी १०० दिवसांची मोहिम

जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त व्हावा

-        जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. २४ : जिल्ह्यात २८२ ग्रा. पं. क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. आता संपूर्ण जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रयत्न व्हावेत. त्यासाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच लोकसहभाग मिळविण्याचीही गरज आहे. त्यादृष्टीने निक्षयमित्रांचे कार्य महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.

क्षयरोगमुक्त भारत अभियान-१०० मोहिम, तसेच निक्षयमित्रांचा गौरव सोहळा जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ, विनोद करंजीकर, जागतिक आरोग्य संघटनेतर्फे डॉ. सम्यक खैरे यांच्यासह मान्यवर निक्षयमित्र उपस्थित होते.

जिल्ह्यात निक्षयमित्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. क्षयरोगमुक्त भारत अभियानात निक्षयमित्रांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन श्रीमती मेश्राम यांनी केले.

निक्षयमित्रांचा गौरव

निक्षय मित्र योजनेद्वारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांद्वारे टीबी (क्षयरोग) रुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्या पोषण, निदान आणि उपचारांसाठी साह्य केले जाते. जिल्ह्यातील निक्षयमित्रांचा गौरव जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अकोली जहाँगीर येथील श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष नारायण इंगळे, नीळकंठ लांडे, गजानन धर्मे, लायन्स क्लबच्या अध्यक्ष माहेश्वरी देशमुख, हर्षवर्धन पाटील, प्रज्ञा पाटील, मुंडगाव येथील श्री गजानन महाराज पादुका संस्थानचे विजय ढोरे, विलास बहादुरे, गुजरात अंबुजा एक्स्पो. चे अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, कालुराम फूड प्रॉडक्टचे सिद्धार्थ रूहाटिया, श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे अरूण शर्मा, राहूल राठी, सुमित शर्मा, राजू मंजुळकर, पूर्वा अर्बनचे नीलेश चतरकर, दिलीप सांगळे, श्री. चौधरी, अनिल शर्मा आदींचा गौरव झाला.

व्यापक तपासण्या करणार : डॉ. शर्मा

क्षयरोगमुक्त भारत मोहिम-१०० दिवस मोहिमेत केवळ लक्षणे असलेल्या रूग्णांच्या तपासणीवर अवलंबून न राहता जोखीमग्रस्त लोकसंख्येतील लक्षणे नसलेल्या व्यक्तींचीही सक्रिय तपासणी होईल. क्षयरोगाची साखळी खंडित करण्याचे ध्येय आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरांत, तसेच जोखीमग्रस्त गावात आयुष्मान आरोग्य शिबिरे घेण्यात येतील, अशी माहिती डॉ. मनीष शर्मा यांनी दिली. 

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन