‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान राबविणार

‘सीईओं’च्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची बैठक अकोला, दि. 4 : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात “माझं गाव आरोग्य संपन्न गाव”या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून वर्षभर होणार आहे. अभियानाच्या नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या अध्यक्षतेत झाली. ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि परिणामकारक करण्यासाठी हे अभियान राबविले जात असून अधिकाधिक परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश श्रीमती मेश्राम यांनी यावेळी दिले. रोग प्रतिबंधक, प्रोत्साहनात्मक व प्रारंभिक आरोग्यसेवा अधिक बळकट करणे, आरोग्यविषयक जनजागृती व सामाजिक वर्तनात सकारात्मक बदल घडविणे, स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, पोषण व मानसिक आरोग्यावर विशेष भर, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण, मातृ व बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत. अभियानात ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना “आरोग्य संपन्न गाव” म्हणून घोषित करून त्यांना राज्य, विभाग व जिल्हा स्तरावर आर्थिक पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यात राज्यस्तरावरील प्रथम बक्षीस ५ कोटी रू., दुसरे बक्षीस ३ कोटी व तिसरे बक्षीस २ कोटी रू. आहे. विभागीय स्तरावरही १ कोटी, ७५ लाख व ५० लाख रू. अशी अनुक्रमे तीन बक्षीसे दिली जातील. त्याचप्रमाणे, जिल्हास्तरावर २५ लाख, २० लाख व १५ लाख अशी पहिली तीन बक्षीसे आहेत. आरोग्य संस्थांनाही जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार दिले जाणार आहेत. ग्रामपातळीवर ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देश श्रीमती मेश्राम यांनी दिले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कोलखेडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी तुषार जाधव, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते. ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*