गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततामय मार्गाने साजरा करावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 14 : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्ते दुरूस्ती व इतर आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण केल्या जातील. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततामय मार्गाने साजरा व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
गणेशोत्सवाबाबत विविध मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार साजिदखान पठाण, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, हरिश आलिमचंदानी, ॲड. मोतीसिंह मोहता, हाजी मुलाम, सिद्धार्थ शर्मा, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह अनेक मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी विविध मंडळांची निवेदने व मागण्या जाणून घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, रस्त्यांवर खड्डे असल्याच्या तक्रारी आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण करण्यात यावी. विसर्जन मार्गावर दिवे, पेयजल, आरोग्य सुविधा व इतर सुविधा उभारण्यात याव्यात. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येईल. ईद ए मिलाद सणही गणेशोत्सवा दरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. गणेशोत्सव, ईद असे पुढील काळात येणारे सर्व सण सर्व जातिधर्माच्या नागरिकांनी परस्पर सौहार्द राखून शांततामय मार्गाने साजरे करावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणपूरक उपक्रम राबवून शासनाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘महावितरण’ने वीज जोडणी देताना मंडळांकडून घेतलेल्या डिपॉझिटची रक्कम विहित वेळेत परत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. ध्वनीची विहित मर्यादा पाळावी. परवानगी आदी प्रक्रियांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. गणेशोत्सवाचा सण सौहार्दाने साजरा करण्याचे आवाहन श्री. चांडक यांनी केले.
आमदार श्री. सावरकर, आमदार श्री. मिटकरी, आमदार श्री. मिटकरी व विविध मान्यवरांनी गणेशोत्सव, ईद व विविध उत्सव शांततापूर्ण मार्गाने साजरे करण्याचे आवाहन केले. सभेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा