भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा राज्याची समग्र व सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
अकोला, दि. १५ : ‘विकसित भारत 2047’ व ‘विकसित महाराष्ट्र’चे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर समग्र व सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आहे. हा संकल्प अधिक दृढ व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राज्य शासनाची वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, महापालिका आयुक्त सुनील लहाने यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, सैनिकांचे कुटुंबिय व अनेक मान्यवर उपस्थित होते
पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पाच्या व्यापक दृष्टीशी जोडून महाराष्ट्राला 2047 पर्यंत आत्मनिर्भर, समृद्ध, तंत्रज्ञान-समर्थ, सामाजिकदृष्ट्या समतोल आणि पर्यावरणपूरक राज्य बनविण्याचा निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने केला आहे. या दीर्घकालीन उद्दिष्टांचा वेध शासनाच्या अनेक नवनव्या निर्णयांतून दिसून येईल.
ते पुढे म्हणाले की, शेतीच्या उत्पादनक्षमतेत आणि शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ आणि शाश्वत कृषी विकास घडवून आणणे हे विकसित महाराष्ट्र 2047च्या वाटचालीतील महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पीक विविधीकरण, कृषी प्रक्रिया उद्योगांची वाढ, थेट विक्री साखळी, पीक विमा योजनांत सहभाग वाढवणे व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तत्काळ नुकसान भरपाई असे प्रयत्न होत आहेत. गत खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीने बाधित ७१ हजार ४३२ शेतक-यांना ९९ कोटी ६ लक्ष रू. डीबीटी पद्धतीने वितरित करण्यात आले. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगाम 2024 मध्ये 2 लक्ष 64 हजार 885 लाभार्थ्यांना 80 कोटी 9 लक्ष रूपये, तसेच रब्बी हंगामात 1 हजार 416 लाभार्थ्यांना 2 कोटी 22 लक्ष रूपये भरपाई देण्यात आली. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात विविध बाबींसाठी 2 कोटी 22 लक्ष रू. अनुदान वितरणाचे उद्दिष्ट आहे. ‘मनरेगा’मध्ये यंदा 1200 हे. क्षेत्रावर व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 1 हजार हे. क्षेत्रावर फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, एक जिल्हा, एक उत्पादन केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने ‘अकोला कापूस’ या ब्रँडची देशपातळीवर ओळख निर्माण होत आहे. पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी शासनाने दिला असून, जिल्ह्यात रस्ते व पुलांसाठी ३१५ रूपये कोटी निधीतून १३४ कामे पूर्ण झाली. तसेच, ३५ महत्वाच्या इमारतींसाठी ४६९ कोटी रूपये निधी मंजूर केला. अनेक महत्वपूर्ण इमारतींच्या निर्मिती झाली असून, प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कामगारभवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 16 कोटी 61 लक्ष 920 रू. निधीला मान्यता देण्यात आली आहे.
अकोल्यातील वैद्यक क्षेत्राच्या विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन येथे ‘वनस्टॉप ऑल केअर हब’ म्हणून विकास करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे. त्यासाठी 11.78 कोटी रू. निधीही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047’मध्ये पर्यटन क्षेत्रही मोलाची भूमिका बजावणार आहे.त्यादृष्टीने जिल्ह्यात नरनाळा किल्ला व काटेपूर्णा अभयारण्य येथे विविध सुविधा निर्माण होत आहेत. जलद तक्रार निवारण आणि प्रभावी फाइल निकाली काढण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सेवा प्रणाली आणि ई कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या सर्व कार्यालयांत ई- ऑफिस कार्यान्वित केले असून, कामकाजात गतिमानता, अचूकता, पारदर्शकता व जलद सेवेसाठी उपयोग होणार आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सेवा प्रणाली आणि ई कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत २ महिन्यांत २ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे. अमली पदार्थांविरोधात ‘मिशन उडान’लाही गती मिळाली आहे. खेड्यांच्या प्रगतीसाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विविध सन्मान, पारितोषिक वितरण
भारतीय सैन्यातील नायक विज्ञाकर भास्कर सरदार यांना अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावताना अपंगत्व आले. त्यांच्या वतीने त्यांचे बंधू प्रभाकर भास्कर सरदार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ताम्रपट देण्यात आला. देशासाठी योगदान देणा-या सैनिकांच्या, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव यावेळी करण्यात आला.
शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, जिल्हा सूचनाविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, अति. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, स्वीय सहायक गजानन गवई, मोहन साठे, प्रशांत देशमुख, सर्जेराव थोरात, हेमंत जामोदे, निलेश गाडगे, मंगेश ताथुरकर, ऋषिकेश आगरे यांचा सन्मान करण्यात आला.
विविध स्पर्धांत यश मिळविणा-या संस्कार अत्राम, प्राची गर्जे, भक्ती चुंगळे, निर्वाणी नरवाडे, हरिवंश टावरी आदी खेळाडूंना गौरविण्यात आले. स्वामित्व योजनेत सनद वाटपही करण्यात आले.
०००
हर हर महादेव
उत्तर द्याहटवा