सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

 

 

 सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील

 अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे

 -        जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अकोला, दि. 5: सांस्कृतिक कार्य विभागातर्फे, सन 2025 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

            जिल्ह्यातील मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठित करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे समितीच्या अध्यक्षपदी असून, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रादेशिक अधिकारी संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पोलीस उपअधिक्षक आनंद महाजन हे सदस्य आणि जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर हे सदस्य सचिव आहेत.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या Mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर स्पर्धेचे परिपूर्ण अर्ज गणेश चतुर्दशीच्या एका दिवसापूर्वीपर्यंत पाठवावेत, असे आवाहन समितीने केले आहे.

 

           

राज्य समितीकडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे. तर उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

            या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना सहभागी होता येईल. गुणांकनात गायन, वादन, नृत्य, नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, माहितीपट/चित्रपट आदींसाठी प्रत्येकी 2 नुसार एकूण 20 गुण आहेत. संस्कृतीचे जतनअंतर्गत संस्कृती संवर्धन, पारंपरिक भांडी, नाणी, शस्त्र आदी प्रदर्शन, वाङमयीन उपक्रम, लुप्त होणा-या कलाविष्कारांचे संवर्धन आदींसाठी प्रत्येकी 2 असे एकूण 10 गुण आहेत.

राज्यातील गडकिल्ले, तसेच राष्ट्रीय, राज्य स्मारक यांच्या जतन, संवर्धनासाठी प्रत्येकी 5 नुसार एकूण 10 गुण आहेत.

सामाजिक उपक्रमात महिला उपक्रम, पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, व्यसनमुक्ती, ज्येष्ठ नागरिक उपक्रम, शैक्षणिक, कृषी उपक्रम, वंचित घटकांसाठी उपक्रम आदींसाठी प्रत्येकी 2 याप्रमाणे 25 गुण आहेत. त्यात

आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृध्दाश्रम, एखादे गाव दत्तक घेणे अशा प्रकारचे  कायमस्वरूपी उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना 5 गुणांचा समावेश आहे.

पर्यावरणपूरक मूर्तीसाठी 5 व पर्यावरणपूरक सजावटीला 5 गुण आहेत. , ध्वनीप्रदूषणरहित वातावरण असल्यास 5 गुण व  पारंपरिक किंवा देशी खेळांच्या स्पर्धेसाठी 10 गुण आहेत. गणेशभक्तांसाठी पेयजल, प्रसाधनगृह, प्रथमोपचार, वाहतूकीत अडथळा येणार नाही असे आयोजन, स्वच्छता यासाठी प्रत्येकी 2 असे एकूण 10 गुण आहेत.

जिल्हास्तरीय समितीचा ई-मेल : akolaganeshmahotsav@rediffmail.com  

 

                                                  00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा