जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक शहरातील वाहतुकीत शिस्त आणा : जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. १४ : रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक सर्वांचीच सुरक्षितता धोक्यात आणते. त्यामुळे नियमभंग करणा-यांना कायद्याची जरब निर्माण करावी व शहरातील वाहतुकीत शिस्त निर्माण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षक सीमा झावरे व अनेक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अनेकदा वाहनचालक, ऑटोचालक बेशिस्तीने कुठेही वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा आणतात. प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती वाहनात, रिक्षात बसवल्या जातात. शाळकरी मुलांना घेऊन जाणा-या रिक्षातही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असतात. त्याबाबत शाळा, चालक संघटना व पालकांमध्ये जागृती करावी. अनेक बसचालक लक्झरी बसही कुठेही रस्त्यावर उभ्या करतात. हे सगळे थांबण्यासाठी कायद्याची जरब निर्माण करावी. प्रसंगी परवाने रद्द करावेत. मात्र, बेशिस्तांची गय करू नये.
चुकीच्या दिशेने उड्डाण पूलावर शिरणा-या व्यक्तींवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अशा चुकांमध्ये निरपराध व्यक्तींच्या जीवावर बेतू शकते. तसे यापूर्वी घडले आहे. पुलावर चुकीच्या दिशेने शिरता येऊ नये म्हणून स्पाईकगार्ड बसवावेत. पातूर माळराजुरा घाट वळणावर सुरक्षिततेच्या दृष्टीने अपघातप्रवण स्थळ असा फलक, रिफ्लेक्टर्स, रम्बलर्स आदी उपाययोजना करावी. वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयासमोर गतिरोधक, फुटपाथ व्यवस्था व्हावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
> आरटीओ व पोलीसांकडून दि. १६ ऑगस्टपासून मोहिम
> सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑटोरिक्षा व इतर सार्वजनिक वाहनांची कडक तपासणी करण्याच्या दृष्टीने दि. १६ ऑगस्टपासून आरटीओ व पोलीसांच्या सहकार्याने मोहिम राबविण्यात येणार असल्याचे श्री. भुयार यांनी सांगितले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा