डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाचे लोकार्पण विद्यार्थ्यांसाठी राज्यात १२० वसतिगृहे उभारणार - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 















डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाचे लोकार्पण

विद्यार्थ्यांसाठी राज्यात १२० वसतिगृहे उभारणार

-        सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

अकोला, दि. २ : गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात १२० वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी १ हजार २०० कोटी रू. निधीची तरतूदही करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले.

निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा मंत्री श्री. शिरसाठ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, आमदार साजिद खान पठाण, सत्यपाल महाराज,  समाजकल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, समाजकल्याण उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त अनिल वाठ आदी यावेळी उपस्थित होते.

 

मंत्री श्री. शिरसाठ म्हणाले की, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपण प्रथम राज्यातील वसतिगृहाची पाहणी केली होती. खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा अधिक व चांगल्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन १२० वसतिगृहांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात ठिकठिकाणी, तसेच तालुकास्तरावरही वसतिगृहे निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगली सुविधा निर्माण होईल. भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ परिसराचा, तसेच महाड येथे चवदार तळे परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक न्याय भवनामुळे विभागाची सगळी कार्यालये एकाच परिसरात आल्याने नागरिकांसाठी उत्तम सुविधा निर्माण झाली आहे. विभागाची वसतिगृहे शहरापासून लांब अंतरावर असू नयेत. ती शहरालगत असावीत, असे आमदार श्री. पिंपळे यांनी सांगितले.

‘बार्टी’चे उपकेंद्र अकोला शहरात व्हावे, अशी मागणी आमदार श्री. मिटकरी यांनी केली. उपायुक्त श्रीमती केदार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

  ०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा