जिल्हा रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ रानभाज्या उपलब्धतेसाठी विक्री केंद्रे निर्मितीसाठी सकारात्मक - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 










अकोला, दि १५ : रानभाज्या ही निसर्गदत्त देणगी असून, या परिपूर्ण व पोषक अन्नाचा आहारात समावेश असावा. तिचे महत्व नव्या पिढीतही पोहोचले पाहिजे. रानभाज्या संवर्धनाला चालना व उपलब्धतेसाठी शहरात काही ठिकाणी रानभाज्या विक्री केंद्रे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी आज येथे दिली.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्प संचालक (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात ‘रानभाजी महोत्सवा’चा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक मुरलीधर इंगळे आदी उपस्थित होते.
 पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, रसायनमुक्त पारंपरिक आरोग्यवर्धक रानभाज्या निसर्गात मुबलक प्रमाणात  उपलब्ध आहेत. नव्या पिढीत नैसर्गिक शेती पद्धती व रानभाज्यांबाबत, तसेच बहुविधपीकपद्धती याबाबत साक्षरता निर्माण करणे आवश्यक आहे. आमदार श्री. सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.  
रानभाजी महोत्सवात दगडी शेपू, अळू, कळ, तरोटा, चवळी, आघाडा, करटोली, चिवळ, पाथरी, अंबाडी, केना, करवंद, फांद आदी विविध भाज्या, सेंद्रिय धान्य, फळे उपलब्ध असलेल्या कक्षांचा समावेश आहे.  या दालनांना पालकमंत्र्यांनी भेट देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला व माहिती जाणून घेतली. रानभाज्यांची माहिती देणा-या पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा