ज्ञानज्योती व वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू 17 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
ज्ञानज्योती व वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी संधी; 17 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
अकोला,
दि. ४ : राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी घटकांतील एकही विद्यार्थी फक्त आर्थिक
अडचणींमुळे शिक्षणात मागे पडू नये, हे ध्येय बाळगत इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत
“शासकीय वसतिगृह
प्रवेश योजना” आणि “ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले आधार योजना” या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रवेश
व अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2025 असून, इच्छुक
विद्यार्थ्यांनी www.hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा,
असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी केली आहे.
या योजनांतर्गत गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना निवास, पोषणयुक्त आहार,
शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन या स्वरूपात सहाय्य पुरविले जाते. इतर
मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारित शिक्षण
आणि व्यावसायिक प्रगतीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. अर्जांची छाननी,
निवड प्रक्रिया आणि लाभार्थ्यांपर्यंत अचूक अंमलबजावणी यामध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता
राखली जाणार आहे, असेही इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी सांगितले
आहे.
प्रत्येक जिल्ह्यात 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, ‘ज्ञानज्योतीअंतर्गत
600 लाभार्थी या योजनांद्वारे यंदा प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थिनींसाठी
वसतिगृह प्रवेश दिला जाणार आहे. तसेच 600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती योजनेच्या माध्यमातून
शैक्षणिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनांचा उद्देश उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या
ग्रामीण, आदिवासी आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना गरजेनुसार आधार देण्यासाठी असल्याचा
विश्वास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी व्यक्त केला आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत अचूक माहिती अनिवार्य
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांनी www.hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे.
अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला
व ओळखपत्र यांची स्कॅन प्रत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास
अर्ज फेटाळण्यात येणार असल्याची स्पष्ट सूचना सुद्धा ए.बी.धुळाज यांनी केली आहे. नागपूर,
पुणे, छ.संभाजीनगर, नाशिक, कोकण, लातूर व अमरावती येथील राज्य शासनाच्या इतर मागास
बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयांमार्फत अर्जांची छाननी करून निवड केली जाणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत वसतिगृहात प्रवेश व शैक्षणिक
खर्चासाठी निधी देण्यात येईल.
ओबीसी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा : अतुल सावे
राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सामाजिक परिवर्तन घडवणारी चळवळ हाती
घेतली आहे.विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री
तसेच महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी सांगितले.
ज्ञानज्योती योजना आणि वसतिगृह प्रवेश योजनेद्वारे ओबीसी, व्हीजेएनटी
आणि एसबीसी घटकांतील विद्यार्थिनींसाठी
शिक्षण, निवास, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून सुरक्षित व सक्षम अशी शैक्षणिक
वाटचाल घडवून आणली आहे.या योजनांमुळे ग्रामीण व दुर्बल पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनींना
उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्या व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात
स्वतंत्र ओळख निर्माण करू लागल्या आहेत. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असल्यामुळे
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उद्दिष्ट सामाजिक वास्तवात उतरू लागले आहे. हे केवळ
योजना नाहीत, तर हजारो कुटुंबांच्या आशेचा किरण आहेत. विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा
लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा