अवयव दान जनजागृतीसाठी मोहिम
अवयव दान जनजागृतीसाठी जिल्ह्यात मोहिम
अकोला, दि. ४ : अवयव प्रत्यारोपणासाठी
जनजागृतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मोहिम सुरू करण्यात आली असून, दि. १५ ऑगस्टपर्यंत
विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
"देहदान, महादान, दुसऱ्याला जीवनदान”असे यावर्षीच्या
मोहिमेचे घोषवाक्य आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम
व आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम
गाढवे व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या सहकार्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.
अवयवदानाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणे, अवयवदानाच्या गैरसमजांवर
प्रकाश टाकणे, लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहित करणे, अवयवदात्यांचा सन्मान करणे,
गरजू रुग्णांना नवीन जीवनदान देण्यासाठी प्रेरित करण्यासाठी गावे, वाड्या, वस्त्या
या ठिकाणी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी
यांचे मार्फत घरोघरी जाऊन मोहिमेची माहिती देऊन अवयव दानाबाबत प्रोत्साहन दिले जाणार
आहे.
अवयवदान म्हणजे अशी प्रक्रिया
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा अवयव काढून दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपित करण्यास कायदेशीररित्या
परवानगी देते , एकतर दाता जिवंत असताना संमतीने, मृत्यूपूर्वी केलेल्या मृत देणगीसाठी
कायदेशीर परवानगीद्वारे किंवा कायदेशीर जवळच्या नातेवाईकाच्या परवानगीद्वारे मृत देणगीसाठी
परवानगी दिली जाते. देणगी संशोधनासाठी असू शकते किंवा सामान्यतः, निरोगी प्रत्यारोपण
करण्यायोग्य अवयव आणि ऊती दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्यासाठी दान केली जाऊ
शकतात.
प्रत्यारोपणामध्ये मूत्रपिंड , हृदय , यकृत , स्वादुपिंड , आतडे , फुफ्फुसे
, हाडे , अस्थिमज्जा , त्वचा आणि कॉर्निया यांचा समावेश होतो. काही अवयव आणि ऊती जिवंत
दात्यांद्वारे दान केल्या जाऊ शकतात, जसे की मूत्रपिंड किंवा यकृताचा काही भाग, स्वादुपिंडाचा
काही भाग, फुफ्फुसांचा काही भाग किंवा आतड्यांचा काही भाग, परंतु बहुतेक देणग्या दात्याच्या मृत्यूनंतर होतात.
अवयवदान अनेक लोकांचे जीव वाचवू शकते. एका व्यक्तीच्या अवयवदानाने अनेक
गरजू लोकांना नवीन जीवन मिळू शकते. अवयवदान करणे म्हणजे एक सामाजिक कार्य आहे. यामुळे
समाजाला मदत होते आणि गरजू लोकांना आरोग्यदायी जीवन जगण्याची संधी मिळते. अवयवदानामुळे
एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पुनर्जन्म मिळतो, असे मानले जाते. अवयव
निकामी झालेल्या किंवा गंभीर वैद्यकीय परिस्थितीत असलेल्या लोकांना अवयवदानामुळे जीवनात
दुसरी संधी मिळते.
अवयवदानाबद्दल गैरसमज : काही लोकांना
अवयवदानाच्या बाबतीत धार्मिक गैरसमज आहेत. मात्र, अनेक धर्म अवयवदानाचे समर्थन करतात.
काही लोकांना असा गैरसमज आहे की अवयवदानामुळे मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांना उशीर होतो.
मात्र, अवयवदान प्रक्रिया कमी वेळेत पूर्ण केली जाते. काही लोकांना वैद्यकीय गैरसमज
आहेत की, अवयवदान केल्यास त्यांचे शरीर पूर्णपणे निकामी होईल. परंतु, अवयवदान करताना,
डॉक्टरांकडून आवश्यक ती काळजी घेतली जाते.
अवयवदान कसे करावे- अवयवदान करण्यासाठी, तुम्ही राष्ट्रीय
अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या (NOTTO) संकेतस्थळावर किंवा इतर मान्यताप्राप्त
अवयवदान संस्थांमध्ये नोंदणी करू शकता. अवयवदान करण्यापूर्वी, आपल्या कुटुंबातील सदस्यांशी
याबद्दल चर्चा करणे महत्वाचे आहे. त्यांना आपल्या निर्णयाबद्दल माहिती देणे आणि त्यांची
संमती घेणे आवश्यक आहे. या कालावधीत सर्व आरोग्य संस्थेमध्ये, गाव, वाडी, वस्ती इत्यादी
ठिकाणी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी
यांचे मार्फत घरोघरी जाऊन मोहिमेची माहिती देऊन अवयव दानाबाबत प्रोत्सहान दिले जाणार
आहे.या मोहिमेत जास्तीत जास्त नागरीकानी सहभागी होउन मोलाचे दान करावे असे आवाहन करण्यात
आले आहे.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा