शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौरे योजना
शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौरे
योजना
अकोला, दि. ४ : राज्यातील
शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या
उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही
योजना राबविण्यात येत आहे.
योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी
तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करावयाचे असून त्यानुसार जिल्हास्तरावर
वितरीत लक्षांकानुसार सोडत प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांची निवड अंतिम करण्यात येणार
आहे.
जिल्हास्तरावर शेतकऱ्यांची निवड
झाल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संबंधित शेतकऱ्यांना निवड
झालेबाबत अवगत करण्यात येईल. सदर शेतकरी निवड झाल्यानंतर कृषी आयुक्तालयामार्फत
दौऱ्यांचे आयोजन केले जाईल. या योजनेत
प्रति शेतकरी अनुदान हे एकूण दौरा खर्चाच्या ५०% किंवा जास्तीजास्त रु. १.०० लाख
इतके देय आहे. त्यानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत सूचना
प्राप्त झालेनंतरच शासन अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित रक्कम दौरा खर्च म्हणून
भरणा करावयाची आहे.
याबाबतचा तपशील प्रत्यक्ष दौरा
आयोजित करण्यापूर्वी संबंधित निवड झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालयांद्वारे
देण्यात येईल याची नोंद घ्यावी. तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणतीही रक्कम कोणत्याही
व्यक्तीस/संस्थेस/प्रवासी कंपनीस अदा करण्याची आवश्यकता नाही.
काही सोशल मिडिया माध्यमांतून
योजनेबद्दल दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे व दौऱ्यात सहभागी होणेसाठी पैसे
भरणेबाबत सोशल मिडियाद्वारे पोस्ट करणे असे गैरप्रकार घडत असल्याची बाब निदर्शनास
आली असून शेतकऱ्यांनी अशा अफवांना बळी पडू नये असे आवाहन कृषी विभागामार्फत
करण्यात येत आहे.
शेतकरी निवड बाबत अधिकच्या
माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क
साधावा.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा